तोंटद सिद्धराम स्वामीजींकडून आक्षेप
प्रतिनिधी /बेळगाव
नववीच्या समाजविज्ञान पुस्तकात महात्मा बसवेश्वरांच्या जीवनगाथेमध्ये बिगरऐतिहासिक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ही गोष्ट निषेधार्ह आहे, असे डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजींनी सांगितले आहे. चुकीची दुरुस्ती झाली नाही तर सरकारविरुद्ध आंदोलन छेडणे अनिवार्य ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तोंटद सिद्धराम स्वामीजींनी बुधवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पाठय़पुस्तक आढावा समिती ही संघप्रेरित आहे. महात्मा बसवेश्वरांनी मानवीमूल्ये, कर्मसिद्धांत मांडला. अंधश्रद्धेला फाटा देण्याची त्यांची शिकवण आहे. अशा संदेशांना बगल देऊन कपोलकल्पित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वालाच धक्का पोहोचविण्याचे काम झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
बसवेश्वर उपनयनानंतर कुडलसंगमला गेले. शैव गुरुंकडून लिंगदीक्षा घेतली व वीरशैव पंथाचा विकास केला, असा उल्लेख पाठय़पुस्तकात करण्यात आला आहे. लिंगायत या स्वतंत्र धर्माचे बसवेश्वर संस्थापक आहेत. त्यांना हिंदुत्वाशी जोडण्यासाठी पाठय़पुस्तक आढावा समितीने हे कृत्य केले आहे.
विद्यार्थ्यांच्या डोक्मयात चुकीची माहिती भरवून यांना काय साधायचे आहे, असा प्रश्नही तोंटद स्वामीजींनी उपस्थित केला असून अशाच कारणामुळे वेगवेगळे साहित्यिक, कवी आदींनी पाठय़पुस्तकांमधून आपले धडे मागे घेतले आहेत. ही बाब गंभीर आहे. चुकीची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मठाधीशांनी दिला असून यासंबंधी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना एक पत्रही पाठविण्यात आले आहे.
डॉ. सर्जू काटकर यांनी कविता घेतली माघारी
पाठय़पुस्तक आढावा समितीच्या भूमिकेमुळे सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिक डॉ. सर्जू काटकर यांनी नववीच्या तृतीय भाषा पाठय़पुस्तकातील ‘शब्दगळू’ ही कविता त्यांनी मागे घेतली आहे. यासंबंधी मंगळवारी शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांना त्यांनी पत्र पाठविले आहे.









