जिल्हा पोलीसप्रमुखांचे स्पष्टीकरण
बेळगाव : इंगळी, ता. हुक्केरी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना नारळाच्या झाडाला बांधून त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणी कोणीच फिर्याद दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून एफआयआर दाखल करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांकडून फिर्याद घेतली नाही, हा आरोप पोलीसप्रमुखांनी फेटाळून लावला. 26 जून रोजी इंगळी येथील बाबासाब रमजान मुलतानी (वय 35) याने रायबागच्या बाजारात सहा गायी खरेदी करून त्या आपल्या गावी नेत होता. त्यावेळी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवून हुक्केरी पोलीस स्थानकात नेले. बाबासाबने शेती व दुग्धव्यवसायासाठी आपण जनावरे खरेदी केल्याचे सांगत कागदपत्रे हजर केली. त्यामुळे आपली फिर्याद नसल्याचे राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात लिहून दिले होते.
आरडाओरड केल्यामुळे झाडाला बांधून मारहाण
या घटनेनंतर सर्व सहा जनावरे गो-शाळेला पाठविण्यात आली होती. 28 जून रोजी बाबासाब मुलतानी याने कोणाचीच फिर्याद नसल्यामुळे ही जनावरे आपल्या ताब्यात घेऊन इंगळीला नेताना पुन्हा त्याला अडविण्यात आले. घरात कोणी नसताना केवळ महिला असताना त्यांच्या घरात घुसून गोंधळ घातला. महिलांनी आरडाओरड केल्यामुळे नारळाच्या झाडाला बांधून गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली असून या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही पोलीसप्रमुखांनी केले.
हल्ला प्रकार चुकीचा
रविवारी पोलीस दलाला यासंबंधीची माहिती समजली. झाडाला बांधून हल्ला करण्याचा प्रकार चुकीचा आहे. तसेच पाठलाग करून केवळ महिला असताना घरात गोंधळ माजविणेही तितकेच चुकीचे आहे. खरोखरच यांना गो-रक्षकाचे काम करायचे असेल तर पोलिसांची मदत घ्यायला हवी होती. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. या पाच जणांमध्ये महावीर सोलापुरे हा रौडी शिटर आहे. बेळगाव जिल्ह्यातून गुलबर्गा जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तडीपार झालेला युवक कशासाठी येथे आला? असा प्रश्नही पोलीसप्रमुखांनी उपस्थित केला. काही हिंदू संघटनांनी ‘चलो इंगळी’ची हाक दिली आहे. त्याला अवकाश येणार नाही, असेही जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.
मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा
मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, धनंजय जाधव, धनश्री सरदेसाई, इरय्या खोत, नागराज पाटील आदींसह भाजप बहुसंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर निदर्शने केली. गो-संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रकार चुकीचा आहे. पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांची तक्रार घेतली नाही. त्यांच्यावर कारवाई करावी. हल्ल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. हल्ला करणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









