जी. टी. देवेगौडा यांचे काँग्रेसवर टिकास्त्र : जेडीएसचा पुनर्बांधणी कार्यक्रम
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारने लाच घेऊन निधी जमा केला आहे. शिवाय तो निवडणुकीत देखील वापरला आहे. तब्बल 42 कोटींहून अधिक निधी गैरप्रकारे वापरला आहे, असा आरोप जेडीएस कोअर कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री जी. टी. देवेगौडा यांनी केला आहे. केपीटीसीएल सभागृहात शुक्रवारी बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या जेडीएस पक्षाच्या पुनर्बांधणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार एच. डी. रेवण्णा, माजी आमदार एस. व्ही. दत्ता, माजी मंत्री सा. रा. महेश, माजी मंत्री बंडप्पा कशमपूर, माजी मंत्री एच. के. कुमारस्वामी, माजी मंत्री व्यंकटरामन नाडगौडा, माजी मंत्री सी. एस. पुट्टराजू आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा अध्यक्ष शंकर मडलगी होते.
धनगरी ढोल वाजवून स्वागत
प्रारंभी माजी मंत्री आणि आमदारांचे धनगरी ढोल वाजवून स्वागत करण्यात आले. तसेच महिला वर्गही कलश घेवून सहभागी झाल्या होत्या. पुढे टी. जी. देवेगौडा म्हणाले, राज्यात विजेच्या लोडशेडिंगमुळे जनता त्रासून गेली आहे. विशेषत: शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्याची ताकद फक्त कुमारस्वामी यांच्यामध्येच आहे. काँग्रेस सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सत्तेत आल्यापासून केवळ फसवी आश्वासने दिली जात आहेत. यामुळे राज्यातील अनेक स्वामीजींनी भाजप सोबत राज्य वाचविण्याची हाक दिली आहे. यानुसार आम्ही देखील भाजपला पाठिंबा दिला आहे.
तळागाळापर्यंत काहीच पोहोचत नसल्याच्या तक्रारीत वाढ
काँग्रेस सरकारने पाच खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मात्र प्रत्यक्षात तळागाळापर्यंत काहीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सरकारने दिलेली खोटी आश्वासने जनतेसमोर आणण्यासाठी राज्यभर दौरा करत आहे. खोटी हमीपत्रे देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. सरकारकडे विकास कामांसाठी निधी नसल्याची खोचक टीका देखील त्यांनी केली आहे. याप्रसंगी माजी आमदार सुरेश गौडा यासह जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









