पंजाबचा पै. लाली याला झोळी डावावर केले चितपट : दुसऱ्या क्रमांकाची जॉर्जियाच्या पै. टॅडोने गाजविली : कुस्ती शौकिनांची अलोट गर्दी
वार्ताहर /बेडकिहाळ
येथील ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर देवाच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त 26 रोजी सिद्धेश्वर कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन दसरा कमिटी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते. इराणचा जागतिक चॅम्पियन मिर्झा मैदानाचा मानकरी ठरला. पहिल्या क्रमांकासाठी मिर्झा इराणविरुद्ध भारताचा पंजाब हिंदकेसरी लाली (गुरुलाल सिंह) यांच्यात लावण्यात आली होती. 5 मिनिट 32 सेकंदामध्ये मिर्झा याने लाली याला झोळी डावावर चितपट करून पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले. पंच म्हणून सचिन पुजारी यांनी काम पाहिले. दसरा कमिटीचे सर्व सदस्य मान्यवरांच्या हस्ते सदर कुस्ती लावली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जॉर्जियाचा राष्ट्रीय विजेता टॅडोविरुद्ध हरियाणाचा भारत केसरी रवींद्रकुमार हरियाणा यांच्यात झाली. यामध्ये जॉर्जियाचा टॅडोने रवींद्रकुमार हरियाणा याला 5 मिनिट 22 सेकंदात चाकडी डावावर चितपट करून दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. या सामन्याला पंच म्हणून संजय कुडचे यांनी काम पाहिले. तर प्रणव पोलीस-पाटील, कृषी पंडित सुरेश देसाई, ऍड. ब्रिजेश शास्त्राr, अमर शास्त्राr यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतविरुद्ध पंजाबचा शांती पंजाब यांच्यात झाली. या कुस्तीमध्ये किरण भगतने शांती पंजाब याला चितपट करून तिसरा क्रमांक पटकाविला. पंच म्हणून हनुमंत गुरव यांनी काम पाहिले. तर बेडकिहाळ पीकेपीएसचे अध्यक्ष पासगौडा पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक डबल केसरी कार्तिक काटे व इराणचा रिझा यांच्यात झाली. यामध्ये कार्तिक काटे यांनी घुटना डावावर रिझाला चितपट करून विजय संपादन केला. पंच म्हणून तानाजी बंडगर यांनी काम पाहिले तर युवा नेते उत्तम पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. युट्यूबवर गाजलेला नेपाळचा थापा व हिमाचल प्रदेशचा मंजित यांच्या पाचव्या क्रमांकासाठी लावण्यात आली होती. ही कुस्ती 11 मिनिटात थापा यांनी गाजवून बेडकिहाळचा ऐतिहासिक मैदानातील हजारो प्रेक्षकांना खूश केले. सर्वांत रंगतदार कुस्ती झाल्याने थापावर कुस्ती शौकिनांनी पैशाची बरसात केली. प्रदीप देसाई यांनी पंच म्हणून काम पाहिले. आमदार गणेश हुक्केरी, एस. के. कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.
सहाव्या क्रमांकाची कुस्तीसुबोध पाटील व मनीषकुमार यांच्यात झाली. सुभोध पाटीलने घुटना डावावर विजय खेचून विजेता बनले. पंच म्हणून बाळू पाटील चंदुरकर यांनी काम पाहिले. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. प्रकाश इंगळगी व पै. नाथ चौगुले यांच्यात सातव्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. शेवटी ही कुस्ती बरोबरित सोडविण्यात आली. पंच म्हणून सिद्धाप्पा मरिआई यांनी काम पाहिले. आठव्या क्रमांकाची कुस्ती शिवा द•ाrविरुद्ध मनोज कदम यांच्यात लावण्यात आली होती. यामध्ये शिवा द•ाrने एक चाट डावावर मनोज कदम याला चटपट केले. यास पंच म्हणून दौलत येळूर यांनी काम पाहिले.
नव्या क्रमांकाची कुस्ती खामेश बेळगावी व शरद पवार यांच्यात लावण्यात आली होती. ही कुस्ती शेवटी बरोबरीत सोडविण्यात आली. तर दहावा क्रमांकाची कुस्ती बेडकिहाळचा अभिनंदन नाईक व राहुल पाटील यांच्यात झाली. यामध्ये बेडकिहाळ चा अभिनंदन नाईक याला चिटपट करून दहाव्या क्रमांकाचा बक्षीस पटकावले.
संदीप पोलीस-पाटील यांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले. तर प्रणव प्रशांत पोलीस-पाटील यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी सुरेश देसाई यांच्यासह दसरा कमिटीचे सर्व सदस्यांनी कुस्ती मैदानात पुष्पवृष्टी केली. विठ्ठल गावडे व शौर्य गावडे यांच्यात उद्घाटनाची कुस्ती लावण्यात आली होती. पंच म्हणून चंद्रकांत सिद्धनाळे यांनी काम पाहिले. ऐतिहासिक कुस्ती मैदानात आमदार गणेश हुक्केरी, युवा नेते बसवप्रसाद जोले, युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार काका पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. विलास जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सदर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सन 2022 साली दसरा महोत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्यावर्षी मुसळधार पाऊस पडल्याने 1 ते 5 क्रमांकाच्या कुस्त्या रद्द केल्या होत्या. ते सामने यंदा खेळविण्यात आले. त्यात महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीरविरुद्ध भारत केसरी भोला पंजाबी यांच्यात लावण्यात आली. यात हर्षद सदगीरने विजय संपादन केला. पंच म्हणून शहाजी पवार यांनी काम पाहिले. कुस्ती शेतकरी टेक्स्टाईलचे सर्वेसर्वा अनिल खोत यांच्या हस्ते लावण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पुण्याचा सागर बिराजदार आणि हरियाणाचा आशिष कुमार यांच्यात लावण्यात आली. यात सागर बिराजदार यांनी विजय संपादन केला. ही कुस्ती अॅड. देसाई, अॅड. अजित चौगुले यांच्या हस्ते लावण्यात आली. जोल्ले ग्रुप एकसंबा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला तिसऱ्या क्रमांकासाठी अक्षय शिंदे व हॅपी पंजाब यांच्यात झाली. यामध्ये अक्षय शिंदे विजेता ठरला. ही कुस्ती युवानेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते लावण्यात आली. संजय देभाजे हे पंच म्हणून काम पाहिले.
उद्योगपती चंद्रकांत भोजे-पाटील गोवा यांच्यावतीने लावण्यात आलेला चौथ्या क्रमांकाची कुस्ती सुनील करवते व प्रशांत शिंदे यांच्यात झाली. ही कुस्ती प्रशांत शिंदे यांनी जिंकली. पंच म्हणून बसू घोडेगिरी यांनी तर डॉ. विलास जोशी, डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. तर पाचव्या क्रमांकाची कुस्ती संदीप मोटे सांगली व हरियाणाचा रिंकू हरियाणा यांच्यात झाली. त्यात संदीप मोटे विजयी झाले. पंच म्हणून कृष्णा पाटील यांनी काम पाहिले तर दसरा कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे, प्रायोजक नारे कार ऑटोगॅरेज व एस. कुमार वस्त्रालय यांच्या हस्ते लावण्यात आले. याशिवाय शंभरहून अधिक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या. यामध्ये कुबेर रजपूत मिरज, निखिल माने, यांच्यासह अनेकांची कुस्ती लक्षणीय ठरल्या.
कार्यक्रमास वस्ताद विश्वास हरगुले, रवींद्र पाटील बानगे, सतीश पाटील बेळगाव, प्रदीप देसाई-बेळगाव, लक्ष्मण बामणे-बेळगाव, कर्नाटक केसरी कृष्णा, मोहन भोसले, राजू पाटील यांच्यासह गावातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, दसरा कमिटीचे सदस्य, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते, व ग्रामस्थ कुस्ती शौकीन हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पंच म्हणून भारत गौरव अवार्ड विजेता पैलवान हनुमंत गुरव, लक्ष्मण निंबाळकर, दगडू नेजे, बाळू जाधव, अग्नू लवटे, विनायक खोत, कल्लू कारले, विलास टिपगुडे, विनायक खोत, नंदू सुतार यांनी काम पाहिले. निवेदक म्हणून सांगलीचे ज्योतीराम वाझे, व सुकुमार माळी-इंचलकरंजी यांनी काम पहिले. तर बजरंग अबदागीर यांनी हलगीची साथ दिली.









