आषाढ शुद्ध द्वितीयेला प्रारंभ, रथयात्रेला ऐतिहासिक महत्त्व
पणजी : भगवान जगन्नाथाचा रथयात्रा म्हणजे भाविकांसाठी अविस्मरणीय क्षण. काल (मंगळवारी) जगप्रसिद्ध असलेल्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला मिरामार येथील चौकात सुरवात झाली. ओडिशा राज्यातील पुरी येथील भगवान जगन्नाथ हे जगप्रसिद्ध असून, ते चारधामांपैकी एक आहे. रथयात्रेद्वारे आषाढ शुद्ध द्वितीयेला प्रारंभ होतो. गोव्यातही जगन्नाथाचे भाविक मोठ्या संख्येने असून, आज रथयात्रेदरम्यान मिरामार येथे भक्तिरसात न्हाऊन गेले. या भाविकांनी मिरामार सर्कलजवळील श्री हनुमान मंदिरासमोरून भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली. दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला दरवर्षी पुरीतील जगन्नाथ मंदिरातून ऐतिहासिक रथयात्रा निघते. यंदाच्या या यात्रेचा प्रारंभ मंगळवारी झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेसाठी पुरी या ठिकाणी सुमारे 5 लाखांहून अधिक भाविक जमल्याची नोंद झाली. या यात्रेत सकाळी भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम यांचे रथ हाताने ओढण्यात आले. ज्यावेळी पुरी या ठिकाणी या यात्रेला सुरवात होते, त्याचवेळी जगभरातील भाविक ज्या ठिकाणी ज्या राज्यात राहत आहेत त्या ठिकाणी हा रथयात्रेचा सोहळा आयोजित करतात. गोव्यातील भाविकांनाही आराधना सुरू केली आणि त्याचाच एक भाग म्हणून मिरामार सर्कलजवळील श्री हनुमान मंदिरासमोर भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली. रथयात्रेत सहभागी होणे म्हणजे शंभर यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य मिळवणे, असा समज भगवान जगन्नाथांच्या भाविकांमध्ये आहे. यावेळी उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दिवसभर पावसाचा शिडकावा नसल्याने ही रथयात्रा कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली.









