बेळगाव :एसकेई सोसायटी संचलित जीएसएस पीयु कॉलेजच्यावतीने गुरुवारपासून मिराकी युवा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. मिराकी सायन्स आणि संस्कृत फेस्टिव्हल या तीन दिवशीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज शिंदे, एसकेईचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, सदस्य बिंबा नाडकर्णी, बी. डी. कलघटगी, प्राचार्य प्रणव पित्रे, प्रा. अनिल खांडेकर, प्रा. किर्ती फडके आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत व प्रार्थना सादर केली. प्राचार्य प्रणव पित्रे यांनी स्वागत केले. प्रा. साक्षी कुलकर्णी यांनी परिचय केला. मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.यावेळी धर्मराज शिंदे म्हणाले, कॉलेज स्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानाशी संबंधित स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार्या आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत:ची आवड ओळखून यामध्ये उस्फुर्तपणे सहभागी व्हावे.
यावेळी एस. वाय. प्रभू म्हणाले, विज्ञानाशी निगडीत शिक्षण प्रणालीमुळे समाजाचा विकास होतो. त्यामुळे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित अनेक कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
या तीन दिवसांमध्ये विज्ञानाशी निगडीत सर्व प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये प्रश्नमंजुषा, वैज्ञानिक प्रकल्प, नृत्य, गायन, भाषण, ट्रेजरहंट, चित्रफिती तयार करणे, छाया चित्रे, रोबोटिक्स, टोस्टमास्टर, बोधकथा, चित्रकला, नाटक, शालेय गुणात्मक स्पर्धा, विविध सायन्स मॉडेल्सचे प्रदर्शन आदी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह देवून गौरव केला जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांचा अभ्यास करून त्यामध्ये नवीन गुण रुजविण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleजेवल्यानंतर सतत जळजळ होतेय, हे उपाय ट्राय करा
Next Article सावंतवाडीच्या सुपुत्राला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार