मिरज प्रतिनिधी
शहरातील विजापूर- वेस येथे बालगंधर्व नाट्यगृहाला लागून असलेल्या औषध कारखान्याला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. आगीत औषधी साहित्यांसह कारख्यान्यातील अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. अद्यापही कारखान्यात आगेच्या ज्वाला भडकत असल्याने आग नेमकी कशाला लागली याची कारण समजू शकले नाही. एकाच वेळी चार बंबाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा फवारा मारून आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कारखान्याच्या इमारतीतच संबंधित मालकाचे घर आहे. घरात सिलेंडर टाकी वगैर आदी साहित्य होते. अग्निशमन जवानांनी प्रसंगावधान राखत कारखान्यातील सिलेंडर टाकी बाहेर काढल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, आग विझवण्यासाठी घरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा फवारा मारण्यात आला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन घरात साचलेल्या पाण्यामध्ये करंट शिरला आहे. अग्निशमन विभागातील दोन जवानांना पाण्यात करंट लागल्याची घटना घडली. अद्यापही आग विझवण्याचे काम सुरू असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.








