मिरज :
फेब्रुवारीचा दुसरा मंगळवार मिरज तालुक्यासाठी आत्महत्या वार ठरला. एकाच दिवशी तिन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळले. शहरातील भारतनगर येथे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय 20) या इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परिक्षेच्या तणावातून गळफास घेतला. तर शहरातील टाकळी रस्त्यावर सागर गजानन दुर्गाडे (वय 34) या तरुणाने आर्थिक कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तसेच तालुक्यातील खटाव येथे कौटुंबिक कारणातून श्रीशैल मल्लाप्पा जगदाळे (वय 32) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन जीवन संपवले. एकाच दिवसात घडलेल्या या आत्महत्या सत्राने शहरासह तालुका हादरुन गेला आहे.
शहरातील भारतनगर, गवळे प्लॉट येथे बारावी परिक्षेच्या तणावातून प्रथमेश बिराजदार या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. संबंधीत विद्यार्थी हा कृषी विभागातील सहाय्यक अधिकारी बाळासाहेब बिराजदार यांचा मुलगा असून, तो खासगी अकॅडमीत शिक्षण घेत होता. सोमवारपासून परिक्षा असल्याने रविवारी दिवसभर तो अकॅडमीत लेक्चरसाठी थांबला होता. सायंकाळी तो घरी परत आला. बहिणीसोबत चेष्टा मस्करी करत टीव्ही बघितली. त्यानंतर प्रथमेश हा घराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वत:च्या रुममध्ये अभ्यासासाठी गेला.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रथमेशला जेवायला बोलविण्यासाठी त्याची आई रुमकडे गेली. वारंवार आवाज देऊनही प्रथमेशकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आईने दरवाजा उघडला असता, प्रथमेश हा खोलीतील लोखंडी अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. सदर प्रकार पाहताच आईने जोरदार आरडाओरडा केली. बहिणी व वडीलांसह सर्व नातेवाईक धावत आले. प्रथमेशने आत्महत्या केल्याबाबत गांधी चौकी पोलिसात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. बारावी परिक्षेच्या पूर्वसंध्येलाच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. याबाबत गांधी चौकी पोलिसात नोंद आहे.
विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारच्या सुमारास टाकळी रस्त्यावर सागर गजानन दुर्गाडे या तऊणाने आर्थिक कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सागर याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळावऊन मिळालेल्या माहितीनुसार, सागर याने शेअर बाजार व काही ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गुंतविले होते. सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. या आर्थिक नैराश्येतून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली. मात्र, संबंधीत तऊणाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. परंतू त्याने आर्थिक कारणातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज प्राथमिक तपासातून समोर आला आहे.
शहरात लागोपाठ दोन आत्महत्या घडल्या असताना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील खटाव येथे श्रीशैल मल्लाप्पा जगदाळे या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. संबंधीत शेतकऱ्याने कौटुंबिक वादविवादातून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपल्याची चर्चा होती.








