4 वर्षानंतर मीराबाईचे धडाक्यात पुनरागमन
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारताची स्टार वेटलिफ्टर मिराबाई चानूने वर्षभरानंतर स्पर्धेत पुनरागमन करताना राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने 48 किलो वजनी गटात 84 किलो स्नॅच आणि 109 किलो क्लीन अँड जर्क मिळून 193 किलो वजन उचलून हा पराक्रम केला. पॅरिस ऑलिंपिकनंतरची ही तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. पॅरिसमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते आणि त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून दूर होती.
अहमदाबाद येथे सोमवारपासून राष्ट्रकूल चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मिराबाईसह या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या अन्य खेळाडूंनीही सुवर्णपदक जिंकले. पायल आणि सौम्या यांनी या स्पर्धेत अनुक्रमे युवा व कनिष्ठ गटातील 48 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. पायलने 166 किलो वजन उचलले, तर भारताच्याच भवानी रे•ाrने 158 किलो वजनासह रौप्य नावावर केले. दुसरीकडे, मीराबाईने पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि शानदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मलेशियाच्या आयरीन हेन्रीने एकूण 161 किलो (73 किलो + 88 किलो) वजन उचलून रौप्य पदक जिंकले, तर वेल्सच्या निकोल रॉबर्ट्सने एकूण 150 किलो (70 किलो + 80 किलो) वजन उचलून कांस्य पदक जिंकले.
दरम्यान, 2028 मध्ये लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये मीराबाईने 49 किलोऐवजी 48 किलो गटातून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, 49 किलो गटात ऑलिंपिकमधून बाद केला गेला आहे. यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2017 मध्ये 48 किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले आहे. त्याशिवाय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिच्या नावावर दोन सुवर्ण व 1 रौप्यपदक आहे. राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत मिराबाईने 3 सुवर्ण व 1 रौप्य जिंकले आहे. यामुळे आगामी ऑलिंपिकमध्ये तिच्याकडून नक्कीच सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.
राष्ट्रकूल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकल्याचा निश्चितच आनंद आहे. आता, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा मानस आहे.
मीराबाई चानू, भारतीय वेटलिफ्टर









