वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अव्वल महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू अधिक वजन उचलणार नसून ती केवळ या स्पर्धेत औपचारिकता म्हणून सहभागी होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पात्रतेची असल्याने मीराबाई केवळ औपचारिकता पार पाडणार आहे.
भारताची मीराबाईने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले होते. दरम्यान विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियशिप स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा यांच्यात केवळ 20 दिवसांचा कालावधी असल्याने मीराबाईने आशियाई क्रीडा स्पर्धेला अधिक प्राधान्य दिले आहे. विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळवण्यापेक्षा तिने प्रत्येक चार वर्षांनी होत असलेल्या आशियाई खंडीय स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याला प्राधान्य दिले आहे. आता औपचारिकता म्हणून मीराबाई चानू विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उपस्थित राहण्यासाठी रियादला प्रयाण करणार आहे. ही आगामी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मीराबाईला उत्तेजक चाचणी द्यावी लागेल असे तिचे प्रमुख प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले.
2017 साली चानूने विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. यावेळी तिने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता पण 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा पात्रता नियमामुळे चानूला पुढील आठवड्यात होणाऱ्या रियाद येथील स्पर्धेत उपस्थित राहणे जरुरीचे आहे. रियादमधील विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 4 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे तर आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून हेंगझोयु येथे सुरू होईल. रियादमधील स्पर्धेत चानूने 60 किलो वजनगटात आपली प्रवेश पत्रिका दाखल केली आहे. तिचा या स्पर्धेत ड गटात समावेश आहे. जागतिक स्पर्धेत अ गटात स्पर्धकांची नोंद सर्वात अधिक असून त्यानंतर ब आणि क गटात स्पर्धक सहभागी होत आहेत.









