वृत्तसंस्था/ अहमदाबाद
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविणारी 31 वर्षीय मीराबाई चानूचे तब्बल एक वर्षानंतर वेटलिफ्टिंग क्षेत्रात पुनरागमन होत आहे. चानूच्या पुनरागमनामुळे आगामी होणाऱ्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला अधिक पदके मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूचे पदक केवळ एक किलो वजनाने हुकले. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत मीराबाई चानू वारंवार दुखापती समस्येला तोंड देत आहे. 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नव्या वजन गटांचा समावेश असल्याने मीराबाईने 49 किलो ऐवजी 48 किलो वजन गटात प्रतिनिधीत्व करण्याचे ठरविले आहे. मीराबाईने आतापर्यंत दोन वेळेला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके मिळवली असून तिने विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. मणिपूरच्या मीराबाई चानूने आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना समाधानकारक कामगिरी केली आहे. आता येत्या ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मीराबाईने जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे. तसेच ती आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. पुढील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लास्गोमध्ये भरविली जाणार आहे. या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत चीन आणि उत्तर कोरिया सहभागी होणार नसल्याने चानूला पदकाची संधी अधिक असल्याचे सांगण्यात आले. 2023 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 20 पदकांची कमाई केली होती. तसेच त्या स्पर्धेमध्ये बिंदीयाराणी देवीने रौप्यपदक तर हरजिंदर कौर, लवप्रित सिंग यांनी कांस्यपदके मिळवली आहेत.
भारतीय वेटलिफ्टिंग संघ – महिला : मीराबाई चानू (48 कि.), स्नेहा सोरेन (53 कि.), बिंदीयाराणी देवी (58 कि.), सेरम निरुपमा देवी (63 कि.), हरजिंदर कौर (69 कि.), हरमनप्रित कौर (77 कि.), वनशिता वर्मा (86 कि.), मेहक शर्मा (86 कि. वरील). पुरुष : सी. ऋषिकांता सिंग (60 कि.), एम. राजा (65 कि.), नारायण अजित (71 कि.), व्हेलुरी अजयबाबू (79 कि.), अजय सिंग (88 कि.), दिलबाग सिंग (94 कि.), हरचरण सिंग (110 कि.), लवप्रित सिंग (110 कि. वरील).









