वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची अव्वल महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या पदक मोहीमेला बुधवारी प्रारंभ होत आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारताला रौप्य पदक मिळवून देणारी मीराबाई चानू आता सलग दुसरे पदक मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत मीराबाईला सातत्याने दुखापतीने हैराण केल्याने तिला तंदुरुस्ती राखण्याकरिता झगडावे लागले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत छानुला मांडीची स्नायु दुखापत झाली होती. पण या दुखपतीतून ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. चानूने गेल्या काही दिवसांपासून आपल्या सरावावर अधिक भर दिला. चानूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 201 किलो वजन उचलले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकविले होते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई महिलांच्या 49 वजन किलो गटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले होते. मीराबाईला या वजन गटात चीनची विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन होयु झीहुई ही प्रमुख प्रतिस्पर्धी राहिल. मणिपूरच्या मीराबाई चानूला प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी मीराबाईने जोरदार तयारी केली असून ती या स्पर्धेत निश्चित चांगली कामगिरी करुन भारताला पदक मिळवून देईल, असा विश्वास प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केला. 29 वर्षीय मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. येत्या गुरूवारी मीराबाई 30 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. महिलांच्या 49 वजन किलो गटात यावेळी उत्तर कोरियाची महिला वेटलिफ्टर तसेच आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन आणि विश्वविक्रमवीर री साँग गुम हिची गैरहजेरी चांगलीच जाणवेल.









