वृत्तसंस्था/ अमृतसर (पंजाब)
2022 बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे भारताचे वेटलिफ्टर्स मिराबाई चानू आणि अचिंता शेऊली यांचे मायदेशी भारतीय शौकिनांनी जोरदार स्वागत केले.
भारतीय वेटलिफ्टर्स मिराबाई चानू आणि शेऊली यांनी बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. या दोन्ही महिला वेटलिफ्टर्सचे अमृतसरच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे लवप्रित सिंग आणि गुरुदीप सिंग या पदक विजेत्यांचे त्यांच्या चाहत्यांनी स्वागत केले. लवप्रित सिंग आणि गुरदीप सिंग या वेटलिफ्टर्सनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रत्येकी एक कास्यपदक मिळविले आहे.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या 73 किलो वजन गटात वेटलिफ्टींगमध्ये अचिंता शेऊलीने एकूण 313 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. त्याने स्नॅचमध्ये 143 तर क्लिन आणि जर्कमध्ये 170 किलो वजन उचलले. महिलांच्या 49 किलो वजनगटात मिराबाई चानूने सुवर्णपदक मिळविले. तिने या क्रीडा प्रकारात स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात 84 किलो तर दुसऱया प्रयत्नात 88 किलो वजन उचलत सुवर्णपदक निश्चित केले. तिने एकूण 115 किलो वजन उचलत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या 109 किलो वजनगटात लोव्हप्रितने एकूण 355 किलो वजन उचलत कास्यपदक पटकाविले. पुरुषांच्या 109 वरील वजन गटात गुरुदीप सिंगने कांस्यपदक मिळविताना एकूण 390 किलो वजन उचलले.









