वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुमारे दीड महिन्यापूर्वी झालेल्या मांडीच्या दुखापतीतून सावरलेली ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू आता 95 टक्के तंदुऊस्त झालेली आहे. परंतु पुढील आठवड्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती भाग घेणार नाही, असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी गुऊवारी सांगितले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलेली चानू सध्या सेंट लुईस, अमेरिका येथे डॉ. एरॉन हॉर्शिग यांच्या मार्गदर्शनाखालील 65 दिवसांच्या शिबिरात सहभागी झालेली आहे, तथापि, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत आणि आशियाई खेळांमध्ये ती भाग घेईल. मीराबाईला थोडी दुखापत झाली होती, त्यातून सावरण्यासाठी तिचे सेंट लुईसमध्ये पुनर्वसन सुरू आहे. ती आता 95 टक्के तंदुऊस्त आहे आणि चांगले प्रशिक्षण घेत आहे, असे यादव यांनी पत्रकारांना सांगितले.
सुमारे दीड महिन्यापूर्वी मीराबाईने मांडीचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे आम्ही तिला लगेचच अमेरिकेत पाठवण्याची तयारी केली, असे त्यांनी सांगितले. चानू 2020 पासून माजी वेटलिफ्टर आणि फिजिकल थेरेपिस्ट तसेच ‘स्ट्रेंथ-कंडिशनिंग’ प्रशिक्षक हॉर्शिग यांचा सल्ला घेत आहे. तिच्या स्नॅच तंत्रावर परिणाम केलेल्या असंतुलनाच्या समस्येचे निराकरण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. चानूने त्यांच्याकडून अनेकदा प्रशिक्षण घेतले आहे.
दरम्यान, ग्रेटर नोएडा येथे 12 जुलैपासून राष्ट्रकुल वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा स्पर्धा होणार असून 28 जुलैपासून त्याच ठिकाणी आशियाई युवा आणि कनिष्ठ स्पर्धा होणार आहे. त्यांच्या आयोजनाची तयारी सध्या भारतीय वेटलिफ्टिंग महासंघ करत आहे. आम्हाला पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत मीराबाईला जपायचे आहे. स्पर्धेपूर्वी 49 किलो गटासाठी तिला वजन कमी करावे लागेल आणि असे वारंवार करणे तिच्यासाठी चांगले ठरणार नाही, त्यामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही,असे यादव यांनी सांगितले. 4 सप्टेंबरपासून रियाध येथे जागतिक स्पर्धा होणार आहे आणि आशियाई खेळ 20 दिवसांनंतर चीनमधील हांगझोऊ येथे 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.









