वृत्तसंस्था/पाटणा
कथित मतदारसूची घोटाळा प्रकरणात उजेडात आलेल्या बिहारच्या मिंटा देवी या महिला मतदाराने विरोधी पक्षांना धारेवर धरले आहे. मिंटा देवी यांचे वय मतदारसूचीत 124 वर्षे असे दर्शविण्यात आले आहे. यावर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला असून संसदभवनाच्या परिसरात त्यांचे छायाचित्र छापलेले टी-शर्ट घालून आंदोलन करण्यात आले. तथापि, आपण वैध मतदार असून नजरचुकीने आपले वय 124 वर्षे दर्शविले गेल्याचे मिंटादेवी यांनी स्पष्ट केले.
माझी अनुमती न घेता माझे छायाचित्र छापलेले टी-शर्ट घालून आंदोलन करण्याचा अधिकार विरोधी नेत्यांनी कोणी दिला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगालाही त्यांनी त्यांचे वय 124 दर्शविण्यासाठी दोष दिला. माझे वय 124 असेल तर सरकारने मला वृद्धत्व वेतन देण्यास प्रारंभ करावा, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यांचे छायाचित्र असणारे टी-शर्ट काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि नेते गौरव गोगोई यांनी परिधान केले होते.
कोण प्रियांका गांधी ?
आपले छायाचित्र छापलेले टी-शर्ट घालून आंदोलन केल्यामुळे मिंटा देवी संतप्त झालेल्या दिसून आल्या. प्रियांका गांधी कोण ? राहुल गांधी माझे कोण लागतात ? अशी पृच्छा त्यांनी पत्रकारांसमोर केली. या नेत्यांनी असे करणे योग्य नाही. मी भारताची वैध मतदार आहे. माझे वय चुकीचे पडले आहे. ज्यांनी हे माझे असे वय मतदारसूचीत नमूद केले ते झोपलेले असावेत. आता मी या चुका सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाला कळविले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









