वृत्तसंस्था/ मियामी
येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या मियामी खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉर ब्राझीलच्या फोन्सिकाचे आव्हान संपुष्टात आणत पुढील फेरीत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे जर्मनीचा व्हेरेव, अमेरिकेचा टेलर फ्रित्झ यांनी एकेरीची चौथी फेरी गाठली. दरम्यान महिलांच्या विभागात अमेरिकेच्या तृतिय मानांकीत कोको गॉफचे आव्हान पोलंडच्या लिनेटीने संपुष्टात आणले. पाओलिनीने जपानच्या ओसाकाचा पराभव केला. बल्गेरीयाच्या स्वीटोलीनाचे आव्हान स्वायटेकने संपुष्टात आणले आहे.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात अॅलेक्स डी मिनॉरने ब्राझीलच्या 18 वर्षीय फोन्सिकाचा 5-7, 7-5, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीच्या टॉपसिडेड व्हेरेवने ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसनचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत चौथी फेरी गाठली. अलिकडेच झालेल्या इंडियन वेल्स स्पर्धेत व्हेरेवला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. मात्र स्पेनच्या अल्कारेझला मियामी टेनिस स्पर्धेत यापूर्वीच हार पत्करावी लागली आहे. अमेरिकेच्या तृतिय मानांकीत प्र्रित्झने कॅनडाच्या डेनीस शेपोव्हॅलोव्हचा 7-5, 6-3 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात पोलंडच्या लिनेटीने अमेरिकेच्या तृतिय मानांकीत कोको गॉफला पराभवाचा धक्कादेत पुढील फेरी गाठली. लिनेटीने गॉफवर 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये विजय मिळविला. टॉपसिडेड साबालेंकाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना अमेरिकेच्या डॅनेली कॉलिन्सचा 6-4, 6-4 असा पराभव केला. इटलीच्या जस्मिन पाओलिनीने जपानच्या नाओमी ओसाकाचा 3-6, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. पाओलिनीला हा सामना जिंकण्यासाठी टेनिसकोर्टवर सव्वादोनतास झगडावे लागले. अन्य एका सामन्यात इमा राडुकेनोने अमेरिकेच्या अॅनिसीमोव्हाचा 6-1, 6-3 असा पराभव केला. राडू केनोचा पुढील फेरीतील सामना अमेरिकेच्या पेगुलाशी होणार आहे. पोलंडच्या द्वितीय मानांकीत स्वायटेकने युक्रेनच्या स्वीटोलीनाचे आव्हान 7-6 (7-5), 6-3 असे संपुष्टात आणले.









