खंडाळा :
लोणंद येथील शाळेत शिकणाऱ्या व खंडाळा येथे आई वडिलांसोबत राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह राहत्या घरात बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने सदर मुलीची आत्महत्या कि खून झाला याबद्दल पोलिसांमध्येही संभ्रमावस्था असल्याने रात्री उशिरापर्यंत खंडाळा पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद झाली नव्हती.
खंडाळ्यात या कुटूंबाचे सुमारे पाच वर्षापासून वास्तव्य असून वडील खाजगी कंपनीत नोकरी करतात. आई गृहिणी आहे. त्यांची एकुलती एक मुलगी लोणंद येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शाळेतून घरी आली. शाळेच्या कपड्यावरच ती बाथरूममध्ये गेली होती. दरम्यान, काही वेळाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत ती मिळून आली. त्यानंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिला शिरवळ येथे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलगी मृत झाल्याचे घोषीत केले.
घटनास्थळी उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, खंडाळा पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांनी भेट दिली. तसेच रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
- मयत मुलीच्या मनगटावर, गळ्यावर कापल्याच्या खुणा
मुलीच्या मनगटावर व गळ्यावर खोलवर कापल्याच्या खुणा असल्याचे पोलीसांना यावेळी निदर्शनास आले. यावरून मुलीचा खून की आत्महत्या झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.








