सातारा :
सातारा शहरात राहत असलेली अल्पवयीन मुलगी फिजीओथेरपीसाठी सदरबझार येथील उत्तेकरनगरमधील एका क्लिनिकमध्ये गेली होती. यावेळी फिजिओथेरपी दरम्यान डॉक्टरने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत कोणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आदिश रमेश पाटील असे डॉक्टरचे नाव आहे. मुलीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यापासून तो पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलगी डॉ. आदिश रमेश पाटील यांच्या क्लिनिकमध्ये फिजिओथेरपीसाठी गेली होती. यावेळी मोबाईलमध्ये मुलीचे कमरेवरचे फोटो दाखवून ही बाब कोणाला सांगितलीस तर इंजेक्शन देऊन मारून टाकण्याची धमकी दिली. नंतर मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकारामुळे मुलगी घाबरली. ती घरी आल्यापासून चिंतेत दिसत होती. याबाबत तिच्या आई-वडिलांनी विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा डॉ. पाटील यांच्यावर दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच डॉ. पाटील हा पसार झाल्याचे तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर यांनी सांगितले.








