मेखळी, तालुका रायबाग येथील भोंदू मठाधीशाला अटक : पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करणार
बेळगाव : दर्शनासाठी मठात येणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मेखळी, ता. रायबाग येथील एका मठाधीशाला अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. मेखळी येथील राम मंदिर मठाचे हठयोगी लोकेश्वरस्वामी (वय 30) याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. मुडलगी पोलीस स्थानकात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. 13 मे रोजी दर्शनासाठी मठात आलेल्या व घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बागलकोट व रायचूरला तिला नेण्यात आले होते.
बागलकोटमधील एका लॉजमध्ये त्या मुलीवर बलात्कार करून 16 मे रोजी महालिंगपूर, जिल्हा बागलकोट बसस्थानकावर त्या मुलीला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर लगेच त्या मुलीने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला होता. 21 मे रोजी बागलकोट येथील महिला पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस स्थानकाच्या हद्दीच्या आधारावरून हे प्रकरण मुडलगी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी लोकेश्वरस्वामीला अटक केली आहे. लोकेश्वर साबण्णा भंगी (वय 30) हा मूळचा गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर येथील राहणारा असून चार वर्षांपूर्वी रायबाग तालुक्यातील मेखळी येथे त्याने राम मंदिर स्थापन केले आहे. यापूर्वीही काही महिला भाविकांनी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांकडे त्याच्याबाबत तक्रार केली होती.
10 एकर वनजमिनीवर अतिक्रमण करून मंदिर, मठ बांधला
तक्रारी वाढताच लोकेश्वरला मठातून बाहेर काढण्यात आले होते. पुन्हा मठात येऊन त्याने आपले प्रताप सुरूच ठेवले होते. सध्या त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले आहे. मेखळी येथे 10 एकर वनजमिनीवर अतिक्रमण करून त्याने मंदिर व मठ बांधला आहे. हठयोगी लोकेश्वरस्वामी या स्वयंघोषित स्वामीला अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. त्याला पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करण्यात येणार आहे.









