ऋषिकेश येथील घटना ः एकूण 3 जण ताब्यात
वृत्तसंस्था/ ऋषिकेश
उत्तराखंडच्या ऋषिकेश जिल्हय़ातील एका रिजॉर्टमधून गायब झालेल्या रिसेप्शनिस्टप्रकरणी पोलिसांनी भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा पुत्र पुलकितसह तीन जणांना अटक केली आहे. रिसेप्शनिस्टला हे आरोपी देहविक्रयात सामील करू पाहत होती. परंतु रिसेप्शनिस्टने विरोध केल्याने त्यांनी तिची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकला होता.
अंकिता भंडारी असे या रिसेप्शनिस्टचे नाव असून ती 18 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. रिजॉर्ट मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि अंकित यांनी मिळून अंकिताची हत्या करत तिचा मृतदेह कालव्यात फेकला होता. आरोपींनी दिलेल्या कबुलीच्या आधारावर एसडीआरएफचे पथक कालव्यात अंकिताचा मृतदेह शोधला जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयाने दिली आहे. अंकिताची हत्या झाल्याचे समजताच तिचे कुटुंबीय तसेच स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपींना ताब्यात देण्याची मागणी पोलीस स्थानकात पोहोचलेल्या जमावाकडून केली जात होती.









