साखळीतील रवींद्र भवनमध्ये सुरू असलेल्या हरिपाठ सोहळ्यात मुख्यमंत्री रमले भजनात
डिचोली : राज्य मंत्रिमंडळातील कला व संस्कृतीमंत्री मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविल्यानंतर मुख्यमंत्री थेट साखळीत दाखल झाले. रवींद्र भवनमध्ये सुरू असलेल्या दिंडी व हरिपाठ सोहळ्यात भजनात रमून गेले. यावेळी त्यांच्या तोंडावर कोणत्याही प्रकारचा ताण किंवा तणाव दिसून येत नव्हता, सर्व वारकऱ्यांसोबत हरिपाठातील भजन सादर करताना मुख्यमंत्र्यांनीही टाळाचा ठेका धरला व मुखातून हरिनामाचा गजर केला. या हरिपाठातील एका एका मध्यंतरात मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना संबोधीतही केले. या कार्यक्रमातून निघताना त्यांना गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, या विषयावर सध्या काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. आपण केवळ येथे दिंडी व हरिपाठ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलो होतो. आता अन्य एका कार्यक्रमासाठी निघत आहे, असे सांगितले. आपल्या रोजच्याच शैलीत रवींद्र भवनमध्ये दाखल होताच त्यांनी थेट वारकऱ्यांबरोबर बैठक मांडली. हातात टाळ व डोक्यावर टोपी घालून हरिनाम भजनात दंग झाले. मुख्यमंत्री हरिनाम हरिपाठात सहभागी झाल्याचे पाहून वारकऱ्यांच्याही उत्साहाला उधाण आले. त्यांनीही मोठ्या उत्साहाने हरिपाठ सादरीकरण करून रवींद्र भवानातील वातावरण भक्तिमय करुन सोडले.









