शिवराजसिंग यांचा अनुभव, एअर इंडिया प्रकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांना एअर इंडियाच्या विमानातील मोडक्या आसनावर बसून प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी विमान कंपनीविरोधात तक्रार सादर केली आहे. मंत्र्याची अवस्था अशी होते, तर सर्वसामान्य प्रवाशांना काय अनुभव येत असतील अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करुन त्यांनी कंपनीविरोधात त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
आपला हा अनुभव त्यांनी एक्स या सोशल मिडियावरही प्रसिद्ध केला आहे. ते शनिवारी भोपाळहून दिल्लीला चालले होते. त्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट काढले होते. त्यांना 8 सी हे आसन देण्यात आले होते. पण ते जेव्हा या आसनाजवळ गेले तेव्हा ते मोडलेले आहे आणि त्याच्यावरची गादी आत गेलेली आहे, असे दिसून आले. त्यांनी विमान कर्मचाऱ्यांकडे यासंबंधी आक्षेप नोंदविला. या आसनाची अवस्था ठीक नाही, याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाला देण्यात आली होती. पण आसन दुरुस्त करण्यात आले नाही, अशी माहिती त्यांना विमान कर्मचाऱ्यांनी दिली. जर आसन चांगल्या स्थितीत नसेल, तर त्याच्या तिकीटाची विक्री केली जाऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. केवळ हे एकच आसन नाही, तर विमानातील अनेक आसने अशाच अवस्थेत आहेत. जे प्रवासी चांगल्या आसानावर बसले होते, त्यांनी आपले आसन मला देऊ केले. तथापि, त्यांना त्रास देऊन आपली सोय करुन घेणे मला पटले नाही. त्यामुळे मी त्या मोडक्या आसानावर बसूनच प्रवास केला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









