ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आमदार बच्चू कडू यांना राज्य सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचे अध्यक्ष म्हणून कडू यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
बच्चू कडू हे मागील 20 वर्षांपासून दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा जाहीर केला आहे. ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान संपूर्ण राज्यासह जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यांमध्ये समिती गठित केली जाणार आहे. त्यामध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे, उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय हे सदस्य म्हणून काम पाहतील.
तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ही जिह्याची समिती असेल.








