मध्यप्रदेशातील भाजपच्या नेत्या
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. राज्य सरकार तसेच पक्षसंघटनेला पत्र लिहून त्यांनी स्वत:चा निर्णय कळविला आहे. प्रकृती अस्वास्थाचे कारण त्यांनी या निर्णयाकरता दिले आहे. यशोधरा या सध्या शिवपुरी मतदारसंघाच्या आमदार आहेत. स्वत:च्या निर्णयासंबंधी त्यांनी समर्थकांसोबत चर्चा केली आहे. तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याप्रकरणी त्यांना पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
पक्ष अन् संघटनेत होत असलेल्या कथित उपेक्षेमुळे त्या नाराज होत्या असे बोलले जात आहे. यशोधरा या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नातेवाईक आहेत. ज्योतिरादित्य हे भाजपमध्ये आल्यापासून यशोधर यांची भाजपमधील सक्रीयता कमी झाली आहे. यशोधरा यांनी स्वत:च्या पत्रात निवडणुकीकरता धावपळ करणे जमणार नसल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे भाजपने विधानसभा निवडणुकीकरता अनेक विद्यमान आमदार अन् मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.