वास्को : वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी वास्कोवासियांना विकासाच्याबाबतीत जे जे शब्द दिलेले आहेत ते पूर्ण करू. वास्को शहर एक आदर्शवत शहर करण्याचे स्थानिक आमदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी पूर्ण साथ असेल असे अश्वासन नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी वास्कोत दिले. नगरविकासमंत्री विश्वजीत राणे व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते वास्को शहरातील मासळी मार्केट प्रकल्प आणि बायणातील व्यवसायीक प्रकल्प या दोन प्रकल्पाच्या पायाभरणी नामफलकाचे अनावरण मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले. वास्को शहरातील नगरपालिका इमारतीसमोर आयोजित केलेल्या पायाभरणी समारंभाच्या व्यासपिठावर वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, जिल्हा पंचायत सदस्य अॅङ अनिता थोरात, मुरगावचे नगरसेवक दामू कासकर, विनोद किनळेकर, फॅड्रीक हेन्रीक्स, दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, प्रजय मयेकर, दामोदर नाईक, शमी साळकर, दिलीप बोरकर, मंजुषा पिळर्णकर, देविता आरोलकर, श्रध्दा महाले, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, पालिका मुख्याधिकारी जयंत तारी, प्रशांत नार्वेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी लोकांमध्ये राहून नेत्यांनी विकास कामे पुढे न्यायला हवीत. लोकांमध्ये मिसळून लोकांना सहकार्य करणे महत्वाचे आहे. वास्कोचे आमदार दाजी साळकर तेच करीत आहेत. कामे कशी करून घ्यावीत हे त्यांच्याकडूनच शिकावे. त्यांना कसलेच काम कूणी नाही म्हणू शकत नाही. त्यांच्या कार्यपध्दतीमुळेच वास्कोतील विकास कामे मार्गी लागलेली आहेत. शहर विकास नियोजन योजनेच्या माध्यमांतून शहरांचा विकास करणे शक्य असून वास्को शहराचाही विकास करू. बायणातील व्यवसायीक प्रकल्पासाठी येत्या महिनाभरात निविदा जारी करू असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले. वास्को आता मागे राहणार नाही. स्थानिक आमदारांची विकासासाठी धडपड दिसत आहे. आमदारांनी वास्कोतील लोकांना विकासाची जी जी आश्वासने दिलेली आहेत, ती पूर्ण करू. आदर्श शहराचे आमदार दाजी साळकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी पूर्ण साथ वास्कोवासियांना लाभेल असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.
दोन्ही विकास प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून दाखवावेत – मंत्री माविन गुदिन्हो
मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या मदतीनेच गोवा राज्य विकास करीत असल्याचे सांगून वास्को व दाबोळीत येणाऱ्या नियोजित विकास प्रकल्पांचीही माहीती दिली. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रत्येक मंत्री राज्याच्या विकासासाठी कष्ट घेत आहे. वास्कोतील मासळी मार्केट आणि व्यवसायीक प्रकल्प दीड वर्षांत नव्हे तर वर्षभरात पूर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले. दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावरही मंत्री बोलले, मोपा आल्यावरही दाबोळी चालूच आहे. उलट दाबोळीकडे येणाऱ्या विमानांची संख्या वाढल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे प्रकार चुकीचे आहेत. इथे बंदर आहे. कोळसा नको म्हणणे योग्य ठरणार नाही. रोजगाराचा प्रश्न आहे. कोळशाला विरोध करण्यापेक्षा प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यासाठी गुंतवणुक व्हायला हवी असे मंत्री गुदिन्हो म्हणाले. आमदार दाजी साळकर यांनी मासळी मार्केट प्रकल्प तसेच बायणातील व्यवसायीक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे त्यांनी आभार मानले. मासळी मार्केट प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही कष्ट घेतले होते असेही त्यांनी नमुद केले. वास्कोत होऊ घातलेल्या विकास कामांचीही त्यांनी माहिती दिली. मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी प्रास्तावीक केले. मुख्याधिकारी जयंत तारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी आभार मानले.
आमदार संकल्प आमोणकर यांना समारंभाचे निमंत्रण नाही
दरम्यान, वास्कोतील मासळी मार्केट प्रकल्पासाठी जवळपास आठ कोटी तर बायणातील व्यवसायीक प्रकल्पासाठी 18 कोटी खर्च करण्यात येत आहेत. या दोन मोठ्या विकास प्रकल्पांसाठी आयोजित केलेल्या पायाभरणी समारंभाला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित नव्हते. उपलब्ध माहितीनुसार त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रणच नव्हते. हे प्रकल्प मुरगाव पालिकेतर्फे उभारण्यात येत आहे. प्रकल्पांचे काम गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांनी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत आमदार संकल्प आमोणकर यांचे नावच नव्हते. हा प्रकार जाणून बुजून झालेला आहे की नजर चुकीतून झालेला आहे याबाबत दिवसभर चर्चा पसरली होती.









