जगन्नाथ मुळवी /मडकई
गेले काही दिवस वीजमंत्री सुदिन ढवळीकर विधानसभेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांना मतदारसंघात नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या दुर्घटनास्थळांना व अन्य काही महत्त्वाच्या प्रकल्पाना भेटी देण्यास सवड मिळाली नव्हती. काल रविवारी विधानसभेला सुट्टी असली तरी त्यांनी स्वत: सुट्टी न घेतला दिवसभर त्यांनी मतदारसंघाती सहा आपद्ग्रस्त घरांना भेटी दिल्या. एवढेच नव्हे, तर अनेक सार्वजनिक प्रकल्पांचे निरीक्षण केले. त्यातच भूख लागली म्हणून चहाच्या गाड्यावर विद्यार्थ्यांबरोर बसून त्याच्यांशी गप्पा करता करता भाजीपावाचा आस्वाद घेत नागरिक व कार्यकर्त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला…! गोमंतकाचे भाग्यविधाते व पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी 45 वर्षापूर्वी मडकईत सोडलेल्या संकल्पाची पूर्तता त्यांच्या कन्या व माजी मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांनी केली होती. काळाच्या प्रवाहात मडकईतील काही प्रकल्प जीर्ण झाले आहेत. त्यांची पुर्बांधणी करुन त्यांना नवी झळाळी देण्याचा संकल्प मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गेल्या काही वर्षापासून सोडला आहे. या प्रकल्पांचा पाठपुरावा त्यांनी कालच्या या भेटीत केला.
संरक्षक भिंतीची समस्या
गावणे बांदिवडे येथील श्री पूर्वाचार्य देवस्थानाजवळ असलेल्या सरंक्षक भिंतीच्या बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. तेथील सर्व परिस्थिती समजून घेऊन पूर्वाचार्य देवस्थानचा परिसर व संस्थानच्या प्राकाराला कसल्याच प्रकारचा धक्का पोहचू न देण्याचे नियोजन केले. 2011 साली पूर्वाचार्य देवस्थानची पुनर्बांधणी करताना त्यांनी त्यावेळी सोडलेल्या संकल्पाची पूर्तता करण्याच्यादृष्टीने काही कामांचा आढावा घेतला.
पार्किंग समस्येची पाहणी
मडकई मतदारसंघात अनेक गावांमध्ये रस्त्याच्या आजूबाजूला गाड्या पार्क केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून खूप मोठे नियोजन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अंरुद रस्त्यांमुळे होत असलेल्या छोट्या मोठ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्याचे नियोजनही त्यांनी यावेळी केले. मात्र परिसरातील नागरिकांनी सहकार्य केल्यास सर्व संकल्प तडीस नेले जातील, असे ते म्हणाले. पूर्वाचार्य देवस्थानची 46 वर्षापूर्वीची संरक्षक भिंत चिरेबंधी होती. मात्र पुनर्बांधणी करताना नवीन भिंत काँक्रिकटेने बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चार आपदग्रस्त घरांना भेटी
नैसर्गिक आपत्तीमुळे नागेशी बांदोडा येथील नुकसानी झालेल्या चार घरांना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही नागरिकांकडे रस्ता ऊंदीकरणासाठी स्तलांतर करण्यासंबंधी चर्चाही केली. गावणे येथील सरंक्षक भिंत कोसळून दोन घरांना निर्माण झालेला धोका व त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधीत नागरिकांशी चर्चा केली.
मुलांमध्ये बनले मूल
शालेय मुलांना रविवारची सुट्टी असल्यामुळे खासगी शिकवणीसाठी मुले एकाठिकाणी थांबली होती. मंत्र्यांनी या विद्यार्थ्यांकडे जाऊन त्यांची विचारपूस केली. तसेच चक्क स्वत: एका अत्यंत साध्या चहाच्या गाड्यावर जाऊन त्यांच्यासाठी ज्युस व चॉकलेट खरेदी केल्या. त्या मुलांना वितरीत केल्या. या घटनेवेळी मंत्री चक्क मूल बनून गेले होते. त्याच चहाच्या टपरीवर बसून कार्यकर्त्यांसमवेत पावभाजीचा आस्वाद घेतला. मंत्री ढवळीकर अचानकपणे चहाच्या गाड्यावर येताच या गाड्याचे तरुण मालक समीर व नीलेश मुळवी यांची तारांबळच उडाली. एकंदर मुलांवरील प्रेम व साध्या चहा टपरीवर बसून भाजीपाव खाण्याच्या मंत्रीमहोदयांच्या कृतीमुळे उपस्थितांपैकी अनेकांच्या भूवया उंचवल्या, तर काहीजणांना हा कुतुहलाचा विषय ठरला !









