मडकई : आमदार सुदिन ढवळीकर यांचा सुरुवातीचा राजकीय प्रवास ते आजपर्यंत आमदार म्हणून त्यांच्या जडणघडणीत ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जिवाचा आटापीटा केला व हेच कार्यकर्ते वृद्धत्व व दुर्दर आजारामुळे ढवळीकर यांची भेट घेऊ शकत अशा ज्येष्ठ कार्यकत्यांच्या मंत्री ढवळीकरांनी गाठीभेटी घेतल्या. ‘आमदार तुमच्या दारी’ या संकल्पनेतून आमदार ढवळीकर यांनी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृती चौकशी करतानाच समस्याही जाणून घेतल्या. आमदारांच्या या भेटीमुळे काही वयस्क कार्यकर्ते क्षणभर स्तब्ध झाले, तर काहींना अश्रू अनावर झाले. निवडणूक काळात मतदारांची भेट घेताना उमेदवार मतदारांवर आश्वासनाची खैरात करतात. निवडून आल्यानंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न करता त्यांच्याकडे पाठ फिरवित असतात. मात्र आमदार सुदिन ढवळीकर यांनी अशा कार्यकर्त्यांचे कार्य स्मरणात ठेवून त्यांच्या विषयी नेहमीच आत्मीयता दाखवली आहे. यापूर्वी अशा कार्यकर्त्यांचा त्यांनी मगो पक्ष व माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून सत्कारही घडवून आणित कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक ज्येष्ठ मगो कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. त्यांच्या अजोड कार्यातून उतराई होऊ शकणार नाही, अशी भावना मंत्री ढवळीकर यांनी व्यक्त केली.
काही कार्यकर्ते दुर्धर आजाराने ग्रासले आहेत. त्यांना आपल्या समस्या घेऊन आमदारांकडे येणे शक्य होत नसल्याची जाणिव मंत्री ढवळीकरांना असल्यामुळेच त्यांनी ही नवीन संकल्पना राबविली आहे. काम नसतानाही काही कार्यकर्ते त्यांची नुसतीच भेट घेऊनही जात होते. ते केवळ मगो पक्ष व त्यांच्या प्रेमापोटी. मंत्री ढवळीकरांना याची जाण असल्यामुळे त्यांनी थेट कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेण्याची योजना आखली. आमदार भेटण्यासाठी प्रत्यक्ष घरी आल्याचे पाहून हे ज्येष्ठ कार्यकर्ते सद्गतीत होऊन मंत्री ढवळीकरांना आलींगन देतात. तर काहीजण थेट स्वयंपाक खोलीपर्यंत नेऊन त्यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ करताना दिसतात. घरातील मंडळींच्या चेहऱ्यावर या भेटीच्या आनंदाला पारावर नसतो. आमदारांच्या भेटीमुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याचा उजाळा मिळत असतो. तत्कालीन काही प्रसंगाच्या गत आठवणींना उजाळा मिळतो. मगो पक्ष व पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेबांचे कार्य व विकासा विषयी असलेली तळमळ ते बोलून दाखवताना. विद्यमान युवा पिढीसाठी या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी असतात. मगो पक्षाच्या उभारणीस याच कार्यकर्त्यांनी चाळीस वर्षापूर्वी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. वयोवृद्ध झालेल्या या कर्यकर्त्याची भेट म्हणजे स्व. भाऊसाहेब बांदोडा व माजी मुख्यमंत्री शशिकलाताई यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यासारखा आहे. मगो पक्षाचे उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांनी निवडून दिलेल्या आमदार श्री ढवळीकरांनी एक वेगळाच आदर्श लोकप्रतिनीधी समोर ठेवला आहे.









