मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची सारवासारव
वृत्तसंस्था/ जयपूर
राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पेटला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे क्रीडा मंत्री अशोक चांदना यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे सरकारमधील नाराजांना बळ मिळाले आहे. तर चांदना यांच्या नाराजीनंतर गेहलोत यांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी क्रीडामंत्री चांदना यांना चर्चेसाठी बोलाविले आहे.
चांदना यांनी तणावात राजीनाम्याची टिप्पणी केली असावी, ती गांभीर्याने घेतली जाऊ नये असे गेहलोत यांनी म्हटले आहे. चांदना यांच्यापूर्वी अनेक आमदार आणि एका मंत्र्याने कामकाजाप्रकरणी उघ्ड विरोध दर्शविला होता. चांदना यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव कुलदीप रांका यांच्या हस्तक्षेपाचा आरोप करत राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी क्रीडा विभागाची जबाबदारी रांका यांच्याकडे सोपविण्याची उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली होती.
चांदना यांनी राज्याच्या राजकारणात सचिन पायलट यांच्याऐवजी गेहलोत यांना साथ दिली होती. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद न देण्यात आल्याने गुर्जर समुदायात नाराजी आहे. स्वतः गुर्जर असूनही चांदना यांनी गेहलोत यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता स्थिती बदलली आहे. गेहलोत यांचे निकटवर्तीय दिनेश खोडनिया यांच्या विरोधात चांदना यांनी आघाडी उघडली आहे.









