श्रीपूर प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची शुक्रवारी पाहणी केली . अकलूज येथे त्यांनी शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मोहिते पाटील परिवाराच्या वतीने अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला.
या वेळी आ. राहुल कुल, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावरील नातेपुते, पुरंदावडे, माळशिरस, वेळापूर, वाखरी, पंढरपूर या दौऱ्यासाठी ते आले होते.नामदार रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानुसार या पालखी मार्गाची पहाणी होत आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नागरी सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी पालखी मार्गावरील नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकामाची रस्ते यासंदर्भात सुरू असणाऱ्या कामाची पाहणी केली व कामे पूर्णत्वास जाण्यासाठीचे निर्देश दिले आहेत.
वैष्णवांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर रस्ते, शौचालय, रस्त्यांची डागडुजी व काही प्रलंबित विषय देखील पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. काही कामे वारीच्या अगोदर काम पूर्ण होणार आहेत तर काही नॅशनल हायवे ची कामे तांत्रिक बाबीमुळे येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहेत. निर्मल वारीच्या माध्यमातून वैष्णवांना नागरी सुविधा देण्याचे काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटल्यानंतर आपणास खूप आनंद झाला. त्यांची नेहमीच आपुलकीची भावना राहिली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर राहतील अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.