डॉ. केतन भाटीकर यांची टिका : मंत्री ढवळीकरांनी जिंकली मने
फोंडा : खांडेपार येथील नवीन वीज उपकार्यालच्या उद्घाटन सोहळ्यावर पंचायत मंडळासह बहिष्कार टाकून फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रातील जनतेचा अपमान केला आहे. आपल्याच मतदार संघातील सार्वजनिक कार्यक्रमावर बहिष्कार टाकून मंत्री नाईक यांनी आपल्या राजकारणाची पातळी दाखवून दिली आहे, अशी टिका रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केली आहे.
मुळात खांडेपार येथे वीज कार्यालय व्हावे हा प्रस्ताव मंत्री रवी नाईक यांनीच पाठवला होता. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्याला प्राधान्य देत अवघ्या एका महिन्यात खांडेपार येथे वीज कार्यालयाची सोय केली. पण निमंत्रण पत्रिकेत आपले पुत्र फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांचे नाव नसल्याने व कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी यांना निमंत्रण दिल्याने त्यांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचे आता लपून राहिलेले नाही. रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. गेली तीस वर्षे ते फोंडा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. बहुतेक काळ ते मंत्रीही राहिले आहेत. या काळात त्यांना फोंडा शहरातील वीज प्रवाहात सुधारणा घडवून आणता आली असती. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सध्या फोंडा मतदार संघात भूमिगत वीज वाहिन्यांबरोबरच प्रवाहात सुधारणा घडवून आणण्यासाठी जुन्या उपकरणांच्या जागी नवीन उपकरणे कार्यान्वित करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. ज्यामुळे येणाऱ्या काळात फोंडा शहर व कुर्टी पंचायत क्षेत्रातील खंडित विजेच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. खांडेपार येथील उप कार्यालयाचा फायदा येथील नागरिकांनाच होणार आहे, हे लक्षात घेऊन मंत्री रवी नाईक यांनी मोठ्या मनाने या सोहळ्याला उपस्थित राहायला हवे होते. मात्र कुर्टी पंचायतीचे सरपंच, उपसरपंच व अन्य पंचसदस्यांसह कार्यक्रमावर बहिष्कार टाकून त्यांनी आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडविले आहे. या उलट मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या कामाचे श्रेय स्वत: न घेता मंत्री रवी नाईक यांना देऊन येथील जनतेची मने जिंकली आहेत, असे केतन भाटीकर म्हणाले.
फोंडा शहरात पावसाळा सुऊ होण्यापूर्वीच गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली जात आहेत. बऱ्याच प्रभागांमध्ये अद्याप गटारे उपसण्यात आलेली नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींवर राजकारण करण्यापेक्षा अनुभवी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे, असेही डॉ. भाटीकर म्हणाले.









