वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू एका फौजदारी खटल्यात पहिल्यांदाच कोणत्याही न्यायालयात हजर झाले. बुधवारी न्यायालयात दाखल होत त्यांनी आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात साक्ष दिली. इस्रायलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने फौजदारी खटल्यात साक्ष दिली आहे. साक्ष देण्यास सुरुवात करताच नेतन्याहू यांनी न्यायाधीशांना ‘हॅलो’ असे संबोधले. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बसून किंवा उभे राहून साक्ष देण्याचा विशेष अधिकार प्रदान केला. यानंतर नेतान्याहू यांनी न्यायालयात उभे राहून साक्ष देणे पसंत केले. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. सत्य सांगण्यासाठी मी 8 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो, असे त्यांनी याप्रसंगी न्यायालयाला सांगितले.









