काळम्मावाडीतून कोल्हापूरला पाणी मग इचलकरंजीला वेगळा न्याय का ?
कोल्हापूर प्रतिनिधी
इचलकरंजी शहरासाठी मंजुर असलेल्या सुळकूड पाणी योजनेला विरोध करणारे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे फक्त कागलचे मंत्री आहेत की राज्याचे ? असा सवाल खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह इचलकरंजीच्या सर्वपक्षिय नेत्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला पाणी दिले जाणार आहे, मग इचलकरंजीला वेगळा न्याय का? अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली. जिल्हाधिकारी कार्यालयात सुळकूड पाणी योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार माने म्हणाले, सर्व पर्याय विचारात घेऊनच सरकारने ही पाणी योजना मंजूर केली आहे. यासाठी 160 कोटींचा निधी सर्व शासकिय मान्यतेसह देऊन कोणाला पाणी कमी पडणार नाही याची खबरदारीही सरकारने घेतली आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारे सद्यस्थितीत असणार्या व्यवस्थेला धक्का न लावता नवीन व्यवस्था निर्माण केली जाते.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे जिह्यातील वजनदार मंत्री आहेत. ते फक्त कागलचे मंत्री नसून राज्याचे मंत्री आहे. त्यामुळे त्यांनी या प्रश्नावर बैठक घेऊन तो मार्गी लावण्याची अपेक्षा आहे. या प्रश्नावर शहरविऊध्द ग्रामीण अशाप्रकारे भांडण लावून प्रशासन बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. संविधानाने जिल्हा प्रशासनाला विशेष अधिकार दिले आहेत. त्यानुसार ते टंचाईच्या काळात शेतकर्यांची पिके वाळवून पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी आरक्षित कऊ शकते. इचलकरंजी शहराला दिले जाणारे पाणी हे शेतीसाठी आरक्षित नसणारे आहे. अतिरिक्त पाण्यातूनच ते दिले जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी अन्याय होण्याचा विषयच नाही. तसा प्रश्न निर्माण झाला तर शेतकर्यांसाठी सर्वात पुढे मी असेन.
सुरेश हाळवणकर म्हणाले, सुळकूड योजनेतून इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे या पिण्याच्या पाण्याला कागलच्या नेत्यांनी विरोध कऊ नये. कागल तालुक्यातील शेतकर्यांना पाणर मिळून ते शिल्लक राहात असेल तरच आम्हाला द्यावे. तसे नसेल तर जिल्हाधिकार्यांनी योग्य तो अहवाल पाठवून ही योजना रद्द करावी. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म हा कागल तालुक्यातील आहे. त्यांनी सर्व जिह्याला पाणी देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या तालुक्यतील नेत्यांनी अशी एका शहराला पाणी न देण्याची भूमिका योग्य नाही. मंत्री मुश्रीफ यांनीही केवळ कागलपुरता विचार न करता संपूर्ण राज्याचा विचार करावा.
…मग इचलकरंजी काय पाकिस्तानचा भाग आहे का ?
प्रत्येक नदीकाठच्या गावातील लोकांनी जर मोठ्या शहरांना पाणी देण्यास विरोध केला तर ही शहरे तहानलेलीच राहतील. शहरातील लोकसुध्दा ग्रामीण भागातून येऊन स्थायिक झालेली असतात. त्यामुळे या लोकांनी विरोधाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करत कोल्हापूर शहराला थेटपाईपलाईनद्वारे पाणी दिले जाते मग इचकरंजी काय पाकिस्तानचा भाग आहे का? अशी संतप्त विचारणा खासदार माने यांनी यावेळी केली.