आमदार विजय सरदेसाई यांचा ठपका : उद्योग खात्याला जास्त महत्व
पणजी ; राज्यातील विविध पंचायत सदस्यांना तब्बल वर्षभरापासून त्यांचे मानधन देण्याचा विसर पडलेल्या पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्या पदावर राहण्याचा हक्क गमावला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्वरित काढून टाकावे. त्यापेक्षा त्यांना महिला व बालविकास खाते द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. ही कोपरखळी मारताना तोंडावर आलेले हसू ते लपवू शकले नाहीत. बुधवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गत काही काळापासून गुदिन्हो यांचे वर्तन हे अत्यंत अशोभनीय बनत चालले आहे. परिणामी पंचायत खात्याला न्याय देण्यात ते अपयशी ठरले असून त्यांची एकंदरीत वागणूक पाहता ते पंचायतीच्या विरोधात असल्यासारखे वाटत आहे, असे सरदेसाई म्हणाले. पंचायतींना एवढे अधिकार का दिले पाहिजेत? तसेच औद्योगिक आस्थापनांकडून घरपट्टी वसुल करण्याची काय गरज आहे? यासारखे सवाल त्यांनी थेट विधानसभेत उपस्थित केले आहेत. यावरून ते पंचायतीपेक्षा आपल्या उद्योग खात्याला जास्त महत्व देत आहेत. त्यांच्या या कृतीवरून ते पंचायतविरोधी असल्याचे सिद्ध होत आहे, असे सरदेसाई म्हणाले. त्यांचे हे वर्तन पाहता पंचायत खाते सांभाळण्यास ते पात्र नाहीत, असेच दिसून येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना महिला व बालविकास खाते द्यावे, या खात्याला ते अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतील, असा सल्लाही सरदेसाई यांनी दिला.









