कणकुंबी : कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नव्या पुलाची सोमवारी सायंकाळी पाहणी केली. 1 जुलैपासून कुसमळी पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता कुसमळी पुलाची पाहणी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला वाहतूक सुरू करण्या संदर्भात सूचना केल्या आहेत. कुसमळी पुलावर मंत्री पोहचताच तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी व शहर अध्यक्ष महांतेश राऊत यांनी मंत्री महोदयांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी महादेव कोळी, विनायक मुतगेकर, सुरेश जाधव, सावित्री मादार, प्रसाद पाटील, भैरू पाटील, विलास बेळगावकर यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
अवजड वाहतुकीस बंदीची सूचना
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधण्यात येत असलेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी पुलाचे उर्वरित काम पूर्ण होईपर्यंत या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.









