कर्ज भरण्यासाठी मिळवून दिली मुदत
बेळगाव : मायक्रो फायनान्सच्या कटकटीला कंटाळलेल्या आणखी एका कुटुंबाच्या मदतीला महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर धावून आल्या आहेत. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बसरीकट्टी येथील बसवराज कोंडसकोप यांनी खासगी वित्त संस्थेतून 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्जफेड करणे त्यांना जमले नाही. त्यामुळे वसुलीसाठी सपाटा चालविलेल्या खासगी वित्त संस्थेने मागील तीन महिन्यांपूर्वी बसवराज यांच्या घराला टाळे ठोकले होते. दरम्यान बसवराज यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. मंत्री हेब्बाळकर यांनी व्यथा जाणून घेऊन आपल्या स्वीय सचिवांना खासगी वित्त संस्थेच्या प्रमुखांशी भेट घेऊन चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानंतर खासगी वित्त संस्थेने कर्ज भरण्यासाठी बसवराज यांना दोन महिन्यांची मुदत दिली.
कर्जदारांना विनाकारण त्रास देऊ नये, अशी सूचना स्वीय सचिवांनी खासगी वित्त संस्थेला केली. आठवड्यापूर्वीच बेळगाव तालुक्यातील तारिहाळ येथील माधुरी लोहार या बाळंतिणीच्या कुटुंबाने वेळेत कर्ज न फेडल्याने खासगी वित्त संस्थेने बाळंतिणीसह घरातील सर्व सदस्यांना घराबाहेर काढले होते. यावेळीही मंत्री हेब्बाळकर यांनी माधुरी लोहार कुटुंबाला कर्जभरणा करण्यासाठी मुदत मिळवून दिली होती. तसेच टाळे खोलून घरात प्रवेश मिळवून दिला. अपघातात जखमी झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सध्या स्वगृही विश्रांती घेत आहेत. मात्र आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींवर त्यांनी बारीक लक्ष ठेवले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी मंत्री हेब्बाळकर प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल मतदारसंघातील नागरिक, तसेच हितचिंतकांनी प्रशंसा केली आहे.









