जॅमरची क्षमता कमी करण्याची कारागृह अधीक्षकांना सूचना : दोन दिवसात जॅमरची क्षमता करण्याचे आश्वासन
वार्ताहर /हिंडलगा
मंगळवार दि. 25 रोजी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांना हिंडलगा ग्रा. पं. सदस्य विठ्ठल देसाई, राहूल उरणकर, गजानन बांदेकर यांनी प्रत्यक्ष भेटून हिंडलगा भागातील मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा बंद झाल्याबाबत माहिती दिली. हिंडलगा केंद्र कारागृहामार्फत जॅमर क्षमता वाढविल्याने परिसरातील 4 कि. मी. अंतरापर्यंत मोबाईल सेवा बंद पडलेली असून इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. याबाबत कारागृह अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांना ग्राम पंचायतमार्फत अध्यक्षा, उपाध्यक्षा व सर्व सदस्य सदस्यांकरवी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पाच दिवसात सेवा चालू करण्याचे आश्वासन दिले होते. आ
श्वासन देवूनही लक्ष न दिल्याने या भागातील जनता, विद्यार्थी, व्यापारी, ग्रा. पं.मार्फत बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर कारागृहासमोर ‘रास्ता रोको’ केला होता. यावेळी प्रत्यक्ष निवेदन घेवून दोन दिवसात जॅमर क्षमता कमी करून कारागृह कक्षेत जॅमर ठेवण्याचे वचन दिले होते. या गोष्टीला पंधरा दिवस झाले. तरीही काहीच बदल न झाल्याने पुन्हा मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांना विनंती केली, असता लागलीच कारागृह अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांना दोन दिवसात जॅमर क्षमता कमी करून कारागृह क्षेत्रापुरता जॅमरचा वापर करण्यासंदर्भात सूचना केली आहे. दोन दिवसाचे आश्वासन दिले आहे. आता दोन दिवसात बदल होतो काय हे पहावे लागेल. अद्याप तरी विनंतीची कोणतीच दखल घेतली नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत तरी बदल होतो काय, याची दोन दिवस प्रतीक्षा करावी लागेल.









