Hasan Mushrif News : इचलकरंजी शहराला कागल तालुक्यातील दूधगंगा नदीचे पाणी देण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली. पण या योजनेला दूधगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केला आहे. याचबरोबर इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेली सुळकुड पाणी योजना रद्द व्हावी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे आणि संजय मंडलिक यांनी केली आहे. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी कोणत्याही परिस्थितीत सुळकुड पाणी योजना येऊ देणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. यानिमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, इचलकरंजीतील नेत्यांनी इचलकरंजीला पाणी आणण्यासाठी पंचगंगा, कृष्णा आणि वारणा मधून त्यांनी याबाबत प्रयत्न केला होता. मात्र आता इथली जनता आपल्या हक्काचे पाणी कधीही देणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहे. यावर्षी सुद्धा काळम्मावाडी धरणातून गळती काढण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे ही योजना कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही.त्यांनी कृष्णा नदीतून ही योजना पूर्ण करावी. यासाठी मी नेत्यांशी चर्चा करेन असेही मुश्रीफ म्हणाले.








