Hasan Mushrif News : कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी तारारणी पुतळ्याला अभिवादन करून मुश्रीफ यांनी दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानंतर त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ते पुन्हा कागलच्या दिशेने रवाना झाले. आज कागलमध्ये मुश्रीफ कार्यकर्त्यांशी संध्याकाळी संवाद साधणार आहेत. ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्या नंतर हसन मुश्रीफ अजितदादांच्या गटात गेल्यावर त्यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज ते पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.हसन मुश्रीफांनी मंत्रीपदी शपथ घेतल्याने कोल्हापुरातील स्थानिक राजकारण मोठ्या प्रमाणात बदललं आहे.भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे आता एकत्र आहेत त्यामुळे कोल्हापुरातील राजकारण देखील बदललं आहे. आज मुश्रीफांच्या स्वागतासाठी, के वाय. पाटील, राजेश क्षीरसागर तसेच सर्वपश्रीय नेते उपस्थित होते. काल समरजीतसिंह घाटगे यांनी शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे पुढच्या काळात कोल्हापुरातील राजकारण कोणतं वळण घेतयं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज सकाळीच कोल्हापुरात जिल्हा बॅंकेच्या बॅनवरून चर्चा रंगली होती. त्यातच भाजप कार्यकर्त्यांनी समरजीतसिंह घाटगे यांचा बॅनर लावल्याने बॅनर वॉर दिसून आला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप येत्या काळात कशा पध्दतीने भूमिका घेतात याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.








