ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले. यात सेनेचे २ उमेदवार निवडून आले असले तरी, निवडणुकीच्या आकडेवारीवरून शिवसेनेची १० पेक्षा जास्त मते फुटली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav thackeray) कार्यपद्धतीवरची नाराजीच यातून दिसते. तर मतदानानंतर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे २४ आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १२ वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे.
शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर, आमशा पाडवी यांना सेनेकडे जास्त मते असतानाही केवळ कोट्यापूर्तीच २६ – २६ अशी एकूण ५२ मते मिळाल्याने शिवसेनेचीच अनेक मते फुटली आहेत, याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी १२ वाजता तात्काळ बैठक बोलावली आहे. पण एकनाथ शिंदे हे गुजरात मध्ये असल्याने ते या बैठकीला पस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे दोन डझनपेक्षा जास्त आमदार त्यांच्या संपर्कात असून सध्या त्यांच्यासोबत ११ आमदार गुजरातच्या डी मेरिडिअन हॉटेलमध्ये आहे. हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. एकही व्यक्तीला चौकशी केल्याशिवाय आतमध्ये सोडले जात नाही. तर शिंदेंसोबत असलेल्या आमदारांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि मराठवाड्यातील आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड नाराजी असून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी शिवसेनेतून फूटून छगन भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलेले १७ आमदार होते. तर नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाताना १३ होते, मात्र एकनाथ शिंदेंसोबत २४ हून अधिक आमदार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजतेय. यामध्ये शिवसेनेच्या डझनभर आमदारांचे मोबाईल नॉट रिचेबल असून यापैकी काही जण शिंदेंसोबत गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे.








