ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी धमकी देणाऱ्यास कोकणातून अटक केली आहे. या धमकीचे कॉल रेकॉर्डिंगही समोर आले आहे.
छगन भुजबळ काल पुणे दौऱ्यावर होते. रात्री साडेअकराच्या सुमारास भुजबळ यांच्यासमवेत असणारे संतोष गायकवाड यांच्या मोबाईलवर फोन आला. मी प्रशांत पाटील बोलतोय. मला भुजबळांना मारायची सुपारी मिळाली आहे. मी उद्या त्यांना मारणार, आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगतोय. सुपारी कोणी दिली असं विचारलं असता, दिली अशीच कोणीतरी, असं म्हणतं धमकी देणाऱ्याने फोन कट केला.
त्यानंतर भुजबळ यांच्या वतीने पुणे पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. पुणे पोलिसांनी तातडीने फोन नंबर ट्रेस करत धमकी देणाऱ्या प्रशांत पाटीलला कोकणातून अटक केली. प्रशांत पाटील याने दारुच्या नशेत भुजबळांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.