पुणे / प्रतिनिधी :
रोहित पवार यांच्यासारखा मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्हाला कुणी गॉडफादर कोण नव्हता. मी राजकारणात आलो, तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता, अशा शब्दात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
अजित पवार गटाने शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध टीका करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केली आहे. त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिल्याने भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. भुजबळ यांनी पुण्यातील फुले वाडय़ाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भुजबळ म्हणाले, रोहित पवार आईच्या पोटात असताना मी राज्याच्या महत्त्वाच्या पदावर होतो. रोहित पवारांचा जन्म ते आजपर्यंतच्या काळात राज्याच्या राजकारणातील विविध पदांवर मी काम केले आहे. रोहित पवार यांना राजकारणाच्या इतिहासाची अजून समज नाही. त्यामानाने ते लहान आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक बोलू नये. रोहित पवार यांनी आंबेगाव विधानसभेची निवडणूक लढवावी आणि पडावे, असा टोलाही त्यांनी लगावला.








