मंड्या जिल्ह्यातील 7 साहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याचे कृषीमंत्री चेलुवराय स्वामी यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप झाला आहे. मंड्या जिल्ह्यातील सात साहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी चेलुवराय स्वामी यांच्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार केली आहे, तसेच लाच मागण्याच्या पद्धतीला आळा न घातल्यास आत्महत्या करू असा उल्लेख पत्रामध्ये केला आहे. राज्यपालांच्या विशेष सचिवांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवून कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, मंत्री चेलुवराय स्वामी यांनी आरोप फेटाळले आहेत. तर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कृषीमंत्री चेलुवराय स्वामी हे मंड्या जिल्हा पालकमंत्री असून या जिल्ह्यातील मंड्या, मळवळ्ळी, पांडवपूर, कृष्णराजपेठ, नागमंगल, श्रीरंगपट्टण आणि मद्दूर या तालुक्यांमधील तालुका साहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर 6 ते 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. मंड्या जिल्हा कृषी संचालकांमार्फत आपल्यावर लाच देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असा आरोप साहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे केला आहे. लाच मागण्याच्या पद्धतीला आळा न घातल्यास कुटुंबीयांसमवेत विष प्राशन करू, असा इशाराही तक्रारीत करण्यात आला आहे.
सदर तक्रारीसंबंधी राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदीता शर्मा यांना राज्यपालांच्या विशेष सचिवांनी पत्र पाठवून याविषयी पडताळणी करून कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. तक्रारीविषयी चेलुवराय स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली असून खात्यामार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे.
आरोपाचा इन्कार
लाच मागितल्यासंबंधी राज्यपालांकडे तक्रार केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांमार्फत चौकशी करून अहवाल मागवावा, अशी मागणी मंत्री चेलुवराय स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कृषी खात्यात बदल्यांसाठी लाच मागितल्याचा आरोप मंड्या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे. आपल्यावरील आरोप खोटे आहेत. आपल्याविरोधात फितुरी करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सरकारची बदनामी करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे कारस्थान करण्यात आले आहे, असा प्रत्यारोप त्यांनी केला आहे.
भाजपकडून राजीनाम्याची मागणी
चेलुवराय स्वामी यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप आणि आम आदमी पक्षाने केली आहे. चेलुवराय स्वामी यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे. शिमोगा येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना के. एस. ईश्वरप्पा म्हणाले, राज्याच्या इतिहासात प्रथमच अधिकाऱ्यांनी मंत्र्यांविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोप झालेल्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.









