पणजी पोलीस स्थानकावर हल्ल्याप्रकरण : जेनिफर यांना कामात व्यस्त असताना अर्ज करण्यास मुभा
मडगाव : पणजी पोलीस स्थानकावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणासंबंधीच्या खटल्यात आपल्याला कायम अनुपस्थित राहण्यासाठी अनुमती देण्यात यावी या, संशयित आरोपी आंतासियो मोन्सेरात उर्फ बाबुश मोन्सेरात यांच्या विनंतीवजा अर्जावर, शुक्रवारी मडगावच्या न्यायालयाने निर्णय देताना फक्त 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात गैरहजर राहण्यास अनुमती दिली आहे. मात्र, ओळख पटविण्यासाठी संशयित आरोपी आंतासियो मोन्सेरात यांची गरज निर्माण झाल्यास न्यायालयात हजर राहावे लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मागच्यावेळी खास न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा सीबीआयने या दोन्ही अर्जाना विरोध केला होता.
जेनिफर मोन्सेरात अर्ज करु शकतात
पोलीस स्थानकावर हल्ला करणे ही एक गंभीर बाब असल्याने सुनावणीस गैरहजर राहण्यास अनुमती देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पणजी पोलीस स्थानकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणात आंतासियो मोन्सेरात उर्फ बाबुश मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात, टॉनी रोड्रिग्स, दयानंद कारापूरकर, अँथनी बार्रेटो, जानू रुझारियो मिळून 37 संशयित आरापी आहेत. संशयित आरोपी आंतासियो मोन्सेरात उर्फ बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनीही आपल्याला या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कायम अनुपस्थित राहण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज मात्र खास न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावताना सवलत दिली. संशयित आरोपी जेनिफर मोन्सेरात या आमदार असल्याकारणामुळे त्या कामात व्यस्त असू शकतात. अमूक दिवशी होणाऱ्या सुनावणीस हजर राहू शकत नसतील तर त्या तसा न्यायालयाकडे अर्ज करु शकतात, मात्र कायम स्वरुपी गअसे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपीविरुद्ध सीबीआय या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी हा खटला गुदरला असून मडगावच्या खास न्यायालयाचे न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. सरकारी वकील म्हणून श्री. नौशाद, सीबीआयच्यावतीने काम पाहात आहेत. फेब्रुवारी 2008 मध्ये ताळगावचे तत्कालीन आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या काही समर्थकांना पणजी पोलिसानी अटक केली होती तेव्हा प्रतिस्पर्धी गटातील समर्थकांनाही अटक करण्यात यावी या मागणीसाठी बाबुश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा काढून हल्ला चढविला होता.









