निर्यात करात 30 वरुन 50 टक्क्यांपर्यंत वाढ : खाणी सुरु करण्याच्या प्रयत्नांवर फेरले पाणी,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तातडीने दिल्लीला
प्रतिनिधी /पणजी
केंद्र सरकारने शनिवारी अचानक आदेश जारी करुन देशातून निर्यात होणाऱया लोह खनिज तसेच कच्च्या लोखंडाच्या निर्यात करात प्रचंड वाढ केली आहे. ही वाढ 30 टक्क्यांवरुन 50 टक्के केल्याने गोव्यात बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला गेले असून आजच सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन ते गोव्याची बाजू मांडणार आहेत.
केंद्र सरकारने शनिवारी 21 मे रोजी जारी केलेल्या या आदेशाने गोव्यातील खाण व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. अगोदरच खाण व्यवसाय 2012 पासून बंद पडलेला आहे. तो सुरु करण्यासाठी सरकारने विविध स्तरावर प्रयत्न केले. अलीकडेच विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर लवकरच राज्यातील खाणींचा जाहीर लिलाव पुकारण्यात येणार असून त्यातून गोवा सरकारला शेकडो कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. हे सारे प्रयत्न सकारात्मक दिशेने सुरु असतानाच केंद्राचा हा आदेश गोव्याला अडचणीचा ठरणारा आहे.
गोमंतकीयांच्या आशेवर पडणार विरजण?
राज्यातील खाण व्यवसाय येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल, अशी सगळय़ांना अशा होती. आशा पल्लवीत होत असतानाच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने हा आदेश जारी करून देशातील लोह खनिज निर्यातीवरील डय़ुटीवर 30 टक्क्यांवरून थेट 50 टक्क्यांपर्यत वाढविली आहे. याशिवाय अर्धकच्चे आणि पूर्ण बनावटीच्या स्टीवलवरील करातदेखील अशाच पद्धतीने निर्यात कर प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. गोव्यातील निर्यातदारांना हा दर परवडणे अशक्य असल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना
शनिवारी हा आदेश जारी झाल्यानंतर त्याची कल्पना रविवारी आली आणि लगेच गोव्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्र्याना सदर वृत्त समजताच त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या भटीची वेळ मागून घेतली होती, त्यानुसार ते आज सोमवारी सकाळी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून लोह खनिज तसेच कच्च्या स्टीलवरील निर्यात करात केलेली वाढ तातडीने रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
गोव्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय चालू करण्याची जोरदार तयारी असतानाच या नव्याने लागू केलेल्या कराचा फटका गोव्यातील खाण व्यवसायाला बसणार आहे.
गोव्याची बाजू अर्थमंत्र्यांकडे मांडणार : मुख्यमंत्री
या सदंर्भात मुख्यमंत्र्यांशी रात्री उशिरा संपर्क साधला असता, ते म्हणाले की आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज भेट घेऊन गोव्याची बाजू त्यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतरच गोवा आपला निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.