वृत्तसंस्था/ जम्म्मू
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एक मिनीबस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळावरून 4 मृतदेह हस्तगत करण्यात आले, तर एका गंभीर व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. बळींचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
डोडा-बराथ मार्गावर पोंडा भागात ही दुर्घटना मंगळवारी घडली आहे. मिनीबस रस्त्यावरून घसरत खोल दरीत कोसळली आहे. संबंधित बसमधून 21 जण प्रवास करत होते असे सांगण्यात आले.
यापूर्वी 6 मे रोजी पुंछ जिल्ह्याच्या घानी मेंढर भागात एक बस दरीत कोसळल्याने 2 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 45 जण जखमी झाले होते. मेंढरच्या दिशेने जाणाऱ्या बसवरील नियंत्रण चालकाने गमाविल्याने ही दुर्घटना घडली होती. दुर्घटनेसंबंधी कळताच पोलीस, सैन्य आणि स्थानिक लोकांनी धाव घेत मदत अन् बचावकार्य राबविले होते.









