दापोली :
थंडीचा कडाका सध्या वाढताना दिसून येत आहे. मंगळवारी यावर्षीच्या हिवाळी हंगामातील सर्वात कमी म्हणजे ७.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे. यामुळे दापोलीकरांना हुडहुडी भरली असून ही थंडी कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, दापोलीत आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद १९९१ मध्ये ३.४ अंश सेल्सिअस इतकी झाल्याचे कृषी विद्यापीठाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यात दिवाळीपासून थंडीने जोर धरला होता. परंतु निर्माण झालेल्या वादळामुळे पुन्हा उष्णतेत वाढ झाली यामुळे आंबा, काजू बागायतदार चिंता व्यक्त करत होते. परंतु आठ दिवसापासून थंडीने पुन्हा जोर धरला. त्यामुळे या हिवाळी हंगामात पारा सर्वात कमी म्हणजे ७.८ अंश सेल्सिअसवर घसरला. यामुळे दापोलीकराना चांगलीच हुडहुडी भरल्याचे चित्र पहायला मिळाले.








