बस ५० फूट दरीत कोसळली; प्रवासी सुखरूप , चालकाचा मृत्यू
रायगड : प्रतिनिधी
आज (रविवार) मध्यरात्री २ च्या सुमारास पुण्याहून चिपळूण कडे जाणाऱ्या मिनी बसला वरंधा घाटामध्ये भीषण अपघात झाला. या अपघाता मध्ये सर्व प्रवासी सुखरूप वाचले असून दुर्दैवाने चालकाच्या मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या शिरगाव या गावा जवळ एका अवघड वळणावर झाला.
या अपघाताची पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून पुणे स्वारगेट येथून चिपळूणला जाणारी मिनी बस ( एमएच-०८ / एपी – १५३०) भोर तालुक्यातील नीरा देवधर धरणाच्या बॅक वॉटर जवळून जाणाऱ्या रस्त्यावर आली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बस सुमारे ५० फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने बस मधून प्रवास करणारे दहा प्रवासी सुखरूप वाचले. शिरगाव या गावाजवळ अपघात झाल्याचे समजतात स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी आले . त्याचबरोबर भोर येथील रेस्क्यू टिम ,आणि पोलीस यांच्या मदतीने बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले . प्रवाशांपैकी तीन जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना भोर ( जिल्हा पुणे) उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती भोर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
या अपघातामध्ये मिनी बसचा चालक अजिंक्य संजय कोलते रा.धनकवडी, पुणे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भोर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









