मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विधानसभेत ग्वाही : शैक्षणिक धोरणाची गोव्यात शंभर टक्के कार्यवाही,भाजपने काम केले म्हणून जनतेने पुन्हा निवडून दिले
प्रतिनिधी /पणजी
ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण क्षमतेने खाण उद्योग सुरू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी विधानसभेत बोलताना दिली. नवीन शैक्षणिक धोरणाची 100 टक्के कार्यवाही गोव्यात करण्यात येणार असून बेवारशी, भटक्या गुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी खो घालू नये, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावातील चर्चेत ते बोलत होते. ते म्हणाले की. जनतेसाठी काम केले म्हणून जनतेने भाजपला पुन्हा निवडून दिले. अन्यथा घरी पाठविले असते. मोफत गॅस सिलिंडर योजना लवकरच कार्यवाहीत आणण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात गोवा राज्य अग्रेसर असून अनेक पुरस्कार गोव्याने प्राप्त केले आहेत. त्यातूनच गोव्याची प्रगती, विकास होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट होते, असा दावा डॉ. सांवत यांनी केला.
कुशल नोकऱ्यांवर सरकारचा भर
राज्य सरकारने कुशल नोकऱ्यांवर भर दिला असल्याचे सांगून डॉ. सावंत म्हणाले की, जी 20 जगतिक परिषदेच्या बैठका गोव्यात होणार आहेत. त्याची तयारी गोव्याने सुरू केली असून पुढील 25 वर्षांत म्हणजे 2047 पर्यंत सुंदर भांगराळे गोवा तयार करण्याचे स्वप्न आखण्यात आले आहे.
देशाच्या विकास आराखड्यात गोव्याचाही समावेश
संपूर्ण देशाचा पुढील 25 वर्षाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यात गोव्याचाही समावेश आहे, असे डॉ. सांवंत यांनी नमूद केले.
सुमारे 1. 44 लाख चौ. मी. जमीन लागवडीखाली
कृषी क्षेत्रावर सरकारने भर दिला असून कृषी उत्पादने निर्यात करण्याचे धोरण आखण्यात येणार आहे. सुमारे 1.44 लाख चौ.मी. जमीन कृषी लागवडीखाली आणली आहे. तसेच कृषी महाविद्यालही गोव्यात सुरू केले आहे.
जनजागृतीसाठीच केले जाहीर कार्यक्रम
बरेच विकास प्रकल्प गोव्यात सुरू झाले आहेत, म्हणून त्याबाबतचे जाहीर कार्यक्रम केले ते जनजागृतीसाठी आणि लोकांना कळावे हा उद्देश होता, असा खुलासा डॉ. सावंत यांनी केला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होणारच व त्याची तयारी निश्चित करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. मोपा विमानतळ आणि आयुर्वेद इन्स्टिट्यूट गोव्यासाठी भूषण असल्याचे ते यावेळी म्हणाले.