वृत्तसंस्था/ गोथेनबर्ग (स्वीडन)
येथे झालेल्या 2025 च्या 14 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या विभागातील विश्व युवा चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पंजाबच्या मिनर्व्हा अकादमी एफसी संघाने पटकाविले.
या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात मोहालीच्या मिनर्व्हा अकादमी एफसीने अर्जेंटिनाच्या एस्क्युलाला डी फुटबॉल 18 टुकुमन संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत गोथिया चषकावर आपले नाव कोरले. 2023 साली मिनर्व्हा अकादमी एफसीने 13 वर्षाखालील वयोगटातील विश्व युवा चषक फुटबॉल स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात ब्राझीलच्या ऑर्डीन एफसी संघाचा 2-0 असा फडशा पाडला होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद मिळविणारा मिनर्व्हा अकादमी एफसी हा पहिला भारतीय क्लब संघ ठरला आहे.
अंतिम सामना मिनर्व्हा एफसी संघातर्फे रिदम, योहेनबा, राज आणि देनामोनी यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. या स्पर्धेमध्ये 10 विविध देशांतील सुमारे 67 संघांनी आपला सहभाग दर्शविला होता. या संपूर्ण स्पर्धेत मिनर्व्हा एफसी संघाने एकूण 50 गोल नोंदविले. तर प्रतिस्पर्ध्यांकडून केवळ 2 गोल करवून घेतले.









