पॅरिस ऑलिंपिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या मनू भाकर हिने सरबज्योतच्या साथीने मिश्र सांघिक प्रकारातही साधलेला लक्ष्यभेद मनस्वीच म्हटला पाहिजे. या माध्यमातून देशातील पहिली ऑलिंपिकपदक विजेती महिला नेमबाज होण्यासह दोन पदके मिळविण्याचा विक्रम तिच्या नावावर नोंदविला जाणे, ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल. खरे तर मनूचा हा प्रवास सोपा नव्हता. मनू मूळची हरियाणाची. बॉक्सर आणि मल्लांचे राज्य, ही हरियाणाची ओळख. शालेय जीवनातच मनूला बॉक्सिंग, स्केटिंग, मार्शल आर्ट, टेनिसचा छंद जडला. अनेक खेळांमध्ये तिने पदकेही प्राप्त केली. मात्र, तिच्या मनाचा खऱ्या अर्थाने कुठल्या खेळाने वेध घेतला असेल, तर नेमबाजीने. वयाच्या 14 व्या वर्षी नेमबाज होण्याचा ध्यास तिने घेतला. त्याला निमित्तमात्र ठरली रिओ ऑलिंपिक स्पर्धा. या स्पर्धेपासूनच नेमबाजी हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला. त्यानंतर मनूने अनेक स्पर्धा गाजवल्या असल्या, तरी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जागतिक माजी अव्वल खेळाडू व ऑलिंपियन हिना सिद्धूला दिलेला धक्का हा तिच्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणायला हवा. तेथूनच तिच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला, असे म्हणता येईल. 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरीही अफलातून. मेक्सिकोतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा हादेखील सुवर्णाध्याय ठरावा. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकत दोन वेळच्या विश्वविजेत्या मेक्सिकोच्या अरजेंद्राला नमविण्याची तिची कामगिरी आजही नेमबाजी खेळात लक्षणीय मानली जाते. परंतु, 2019 च्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुपरफास्ट यशाला अचानक ब्रेक लागावा, तसा हा टप्पा. त्यानंतर ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद मिळवत तिने जोरदार कमबॅक केले असले, तरी तिला खुणावत होते, ते ऑलिंपिक पदक. देशाला नेमबाजीत पदक प्राप्त करून द्यायचे, हे तिचे स्वप्न होते. त्या जिद्दीनेच ती टोकियो ऑलिंपिकमध्ये उतरली. मात्र, या स्पर्धेत बंदुकीत बिघाड झाल्याने पात्रता फेरीतच तिला गाशा गुंडाळावा लागला. तिच्यासाठी हा अत्यंत कठीण असा प्रसंग होता. आता सगळे काही संपले. पुन्हा नेमबाजी खेळणे नको, अशीच तिची मानसिकता बनली होती. मात्र, तिचे कुटुंबीय व प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या पाठिंब्यामुळे हे अपयशही तिने पचवले. कोणत्याही खेळाडूसाठी बॅडपॅचचा काळ हा खूप काही शिकविणारा असतो. मनूला याच काळात बरेच काही शिकायला मिळाले, असे दिसते. या काळात धार्मिकतेकडेही वळलेल्या या रायफलक्वीनने भगवद्गीतेचे वाचन सुरू केले. श्रीकृष्ण आणि अर्जुनातील संवाद, त्यातले तत्त्वज्ञान यातील खोली समजून घेतली. तू फक्त कर्म करत राहा. फळाची अपेक्षा बाळगू नकोस, या श्लोकाचा तिच्या जगण्यावर विलक्षण प्रभाव पडला व त्यातूनच ती पुन्हा ताठ कण्याने उभी राहिली. हार किंवा जीत हा फक्त एखाद्या खेळाचा भाग नसतो. तर जीवनातही माणसाला ठायी ठायी याचा प्रत्यय येतो. मात्र, त्याने खचायचे नसते. तर आपल्यातील लढाऊ वृत्ती कायम ठेवत आपले काम करत राहणे, हाच कर्मयोग असतो. तो कर्मयोग अनुसरला की काय होते, हेच पॅरिसमध्ये लक्ष्यभेद करीत भारताच्या या प्रतिभाशाली खेळाडूने दाखवून दिले आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केलेल्या 22 वर्षीय मनूने त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा ऑलिंपिक पदकाला गवसणी घालणे हा दुग्धशर्करायोगच ठरावा. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत पार्टनर सरबज्योतसिंगच्या साथीत तिने देशाला आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले आहे. या दोघांनीही आघाडीच्या कोरियन जोडीचा 16 विऊद्ध 10 गुणांनी केलेला पराभवच त्यांच्यातील गुणवत्तेचे दर्शन घडवतो. मागच्या काही वर्षांत भारतीय नेमबाजांनी जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली. अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठोड, गगन नारंग यांसारख्या खेळाडूंनी अचूक लक्ष्यभेद करीत नेमबाजीत देशाचा दबदबा निर्माण केला. मात्र, हा ओघ पुढे टिकू शकला नाही. मागच्या 12 वर्षांत नेमबाजीत आपल्याला अपेक्षित लक्ष्य साधता आले नाही. हा दुष्काळ मनू भाकर व सरबज्योतसिंग यांनी संपविला, हे समाधानकारक होय. मनूबरोबरच सरबज्योतसारखा हिरा भारताला गवसला, हेही उत्साहवर्धक. भविष्यात त्याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. याशिवाय टेबल टेनिसमध्ये 16 व्या फेरीत स्थान मिळविण्याची मनिका बत्रा हिची कामगिरीही उल्लेखनीय ठरते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. तिच्याकडूनही आशा असतील. दुसरीकडे नेमबाज अर्जुन बबुताचे पदक मात्र थोडक्यात हुकले. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले, तरी त्याने त्याच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. पुढच्या टप्प्यात अन्य खेळांमध्येही भारताला पदकाची संधी असेल. कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकीमध्येही निश्चित आपल्याला आशा बाळगता येतील. फ्रान्सची राजधानी पॅरिसनगरीत जगभरातील शेकडो खेळाडूंचा सध्या मेळा भरला आहे. शेकडो क्रीडापटू यात आपले कौशल्य पणाला लावत आहेत. आणखी बरेच इव्हेंट व्हायचे आहेत. सध्या तरी जपान, फ्रान्स, चीन, ऑस्ट्रेलिया, कोरिया यांसारखे देश आघाडीवर दिसत आहेत. दोन पदकांसह भारत 25 व्या क्रमांकावर आहे. तथापि, त्याबद्दल सतत खेद व खंत करून काही होणार नाही. देशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षणाची उपलब्धता असल्याशिवाय काही होणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील. गुणवत्ता हेरून खरे हिरे पुढे आणावे लागतील. मनू, सरबज्योतने आपली कामगिरी फत्ते केली आहे. भविष्यात त्यांच्याच पावलावर पावल टाकून अनेक क्रीडापटू पुढे येतील व देशाचा तिरंगा फडकवतील, यात संदेह वाटत नाही.
Previous Articleडायव्हिंगमध्ये चीनच्या खात्यात सर्वाधिक सुवर्ण
Next Article दिल्लीत जुन्या वाहनांच्या स्क्रॅपवर कर सवलत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








